Join us
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार वर्षे भांडणारे युतीचे दोन भाऊ आले एकत्र, युतीने दाखवले गोरेगावात शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 22:38 IST

गेली साडेचार वर्षे युतीत गोरेगावात भाजपा व शिवसेनेत श्रेयवादाच्या लढाई होती.

मनोहर कुंभेजकरमुंबई- गेली साडेचार वर्षे युतीत गोरेगावात भाजपा व शिवसेनेत श्रेयवादाच्या लढाई होती. मांडीला मांडी लावून युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र बसले नव्हते. मात्र गेल्या 17 फेब्रुवारीला आगामी निवडणुकांसाठी शिवसेना व भाजपा युती झाली आणि गोरेगाव विधानसभेतील युतीचे चित्र पालटले. साडेचार वर्षे भांडणारे दोन्ही युतीचे भाऊ एकत्र आले. त्याचे दर्शन आज गोरेगावत दिसले. निमित्त होते की, महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या गोरेगाव विधानसभेतील एस. व्ही. रोड येथील निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन  प्रसंगाचे यावेळी शिवसेना व भाजपाच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा आरूढ करण्यासाठी खासदार गजानन कीर्तिकर यांना पुन्हा लोकसभेत गोरेगावातून मोठ्या मताधिक्क्याच्या लिड मिळवून देण्याचे आवाहन सुभाष देसाई यांनी केले. तर राज्याचे हेवीवेट मंत्री सुभाष देसाई आणि विद्या ठाकूर आहेत. 2014 मध्ये कीर्तिकर यांना मोठा लीड मिळाला होता,त्याच्या दुप्पट लीड त्यांना मिळण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घ्यावी, असे आवाहन शेलार यांनी केले.

खासदार कीर्तिकर म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत मी विकासाची अनेक कामे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी केली आहेत. त्यामुळे माझ्या कार्य अहवाल बघून मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा या मतदारसंघातून तिकीट दिले. त्यामुळे पुन्हा गोरेगावातून जास्त लीड मला पुन्हा गोरेगावकर मतदार देतील आणि पुन्हा लोकसभेत पाठवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार, राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर, आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष व आमदार अमित साटम, महिला विभागसंघटक व नगरसेविका साधना माने, भाजपा उपाध्यक्ष दिलीप पटेल, भाजपा उत्तर पश्चिम महिला जिल्हाध्यक्ष सरिता राजपुरे आणि गोरेगावातील युतीचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना आणि आशिष शेलार यांचे गेल्या साडेचार वर्षात खटके उडत होते. शेलार यांचे फोटो सामना मुखपत्रात येत नव्हते. मात्र युती झाल्यावर चित्र बदलले.सुभाष देसाई हे सामनाचे प्रकाशक आहेत. त्यामुळे आता माझा फोटो हा तुमच्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकेलं असा टोला शेलार यांनी लगावताच युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये हास्याचा फवारा उडाला.