Maharashtra Assembly Election Result 2024: राज्यभरातील २८८ विधानसभा जागांसाठी यावेळी एकाच टप्प्यात मतदान झालं. अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे अमित साटम आणि काँग्रेसचे अशोक जाधव यांच्यात लढत झाली. तर दुसरीकडे गोरेगाव मतदार संघात भाजपच्या विद्या ठाकूर यांचा सामना शिवसेना उबाठाच्या समीर देसाई यांच्यासोबत झाला. यामध्ये अमित साटम आणि विद्या ठाकू यांनी बाजी मारली.
अंधेरी पश्चिम मतदारसंघातून भाजपचे अमित साटम विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अशोक भाऊ जाधव यांचा पराभव केलाय. अमित साटम यांना ८४ हजार ९८१ मते मिळाली. तर काँग्रेसचे अशोक भाऊ यांना ६५ हजार ३८२ मते मिळाली. साटम यांनी अशोक भाऊ जाधव यांचा १९ हजार ५९९ मतांनी पराभव केला. यापूर्वी अमित साटम यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता.
तर दुसरीकडे सुरुवातीपासूनच गोरेगावात विद्या ठाकूर यांनी आघाडी घेतली होती. भारतीय जनता पक्षासाठी ही जागा महत्त्वाची आहे. विद्या ठाकूर यांनी येथून सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत. विद्या ठाकूर यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. तर समीर कमलाकर देसाई यांना शिवसेना उबाठाकडून संधी देण्यात आली होती. तर राज ठाकरे यांच्या मनसेकडून वीरेंद्र जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
२०१४ मध्ये पहिल्यांदा कमळ फुललं
गोरेगाव मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच कमळ फुललं. येथे भाजपच्या विद्या ठाकूर विजयी झाल्या. २०१४ च्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेच्या सुभाष देसाई यांचा पराभव केला होता. चुरशीच्या लढतीत त्यांनी देसाईंचा ४,७५६ मतांनी पराभव केला. पुढच्या निवडणुकीत विद्या ठाकूर भाजप आणि शिवसेनेच्या संयुक्त उमेदवार झाल्या आणि त्या पुन्हा निवडून आल्या. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. २०१९ मध्ये त्या ४८ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या.