Municipal Election Result 2026: मुंबई महापालिकेत महायुतीतील मोठा भाऊ या नात्याने भाजप महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील असला, तरी मुंबईतील शिवसेनेची जादू ओसरलेली नाही किंबहुना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या आणि एकच राजकीय डीएनए असलेल्या उद्धवसेना, मनसे आणि शिंदेसेना यांना मिळालेल्या जागांची बेरीज भाजपच्या संख्याबळापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ठाकरेंच्या हातून महापालिका निसटली, पण शिवसेनेची जादू पूर्णपणे लोपलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरे यांच्या करिष्याचा उद्धवसेनेला अधिक फायदा झाला, मनसेला तेवढा झालेला नाही. काँग्रेस पक्षाचे तोंड वंचित बरोबर युती करून पोळलेले असताना आणि कुठलाही बडा नेता प्रचारासाठी आलेला नसतानाही काँग्रेसला मिळालेल्या जागा त्याची हे त्याची मुळे मुंबईत किती खोलवर रुजली आहेत, याचे निदर्शक आहे. उद्धवसेना-मनसे-काँग्रेस अशी महाविकास आघाडी झाली असती, तर कदाचित महायुती आणि महाविकास आघाडी तुल्यबळ लढत झाली असती. उद्धवसेनेला काँग्रेसमुळे किती फटका बसला ते अजून स्पष्ट व्हायचे आहे.
ठाण्यात शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत, उद्धवसेनेची सद्दी संपली
ठाण्यात शिंदेसेना आणि भाजप यांची युती झालेली असली, तरी शिंदेसेनेचे संख्याबळ मागील वेळेपेक्षा वाढले आहे. ठाण्यातील उद्धवसेनेची सद्दी संपवण्यात शिंदेसेनेला यश आले. मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना भोपळा फोडता आलेला नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप महापौर बसवणार?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर बसवण्याचे स्वप्न भाजप पाहू लागला आहे. केडीएमसीत बिनविरोध नगरसेवक विजयी करण्यात बाजी मारलेल्या भाजपचा स्ट्राइक रेट २५ टक्के असून, डोंबिवलीने भाजपला महापौरपदापर्यंत नेले आहे.
नवी मुंबईत नाईक-शिंदे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
नवी मुंबईत शिंदेसेनेचा टांगा पलटी करून वनमंत्री गणेश नाईक यांनी हा आपलाच गड असल्याचे सिद्ध केले. नवी मुंबईत नाईक यांना तर ठाण्यात शिंदे यांना जनमताचा कौल मिळाल्यामुळे भविष्यातही या दोघांमधील राजकीय संघर्ष सुरू राहील, अशी चिन्हे आहेत.
उल्हासनगरात साई पक्षाने शिंदेसेनेला पाडले तोंडघशी
उल्हासनगरात साई पक्षाने अपशकुन केल्याने शिंदेसेनेच्या युतीला फटका बसला, तर भाजपची स्वबळावर लढण्याची खेळी त्या पक्षाला लाभदायक ठरली.
भिवंडी: 'कोणार्क'चे उपद्रवमूल्य कायम
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आणि आ. रईस शेख यांच्या संघर्षात काँग्रेसला भिवंडीत चांगलाच लाभ झाला. मात्र, मागील वेळी बहुमत मिळवलेल्या काँग्रेसची सत्ता घालवण्यास कारणीभूत ठरलेल्या कोणार्क विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले.
मिरा-भाईंदर : ठाकरे बंधूंची युती भाजपच्या पथ्यावर
भाजपमधील नाराजी व बंडखोरी, शिंदेसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी निर्माण केलेले आव्हानाचे वातावरण यावर मात करून भाजपने सर्वात मोठा विजय नोंदवला. उद्धवसेना आणि मनसे युतीचा फटका शिंदेसेनेला बसला.
वसई : 'बविआ'वर मतदारांचा विश्वास
वसई-विरार महापालिकेची निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई होती. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआवर वसई-विरारकरांनी विश्वास दाखवत स्पष्ट बहुमत दिले.
पनवेल : पांढरपेशा मतदारांवर जादू कायम
एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर-प्रशांत ठाकूर यांनी मतदारांवरील भाजपची जादू कायम राखली.