Join us  

औषधांच्या विक्रीलाही कोरोनाचा कडू डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 5:39 PM

राज्यातील केमिस्टही आर्थिक अडचणीत ; विक्रीत २५ ते ३० टक्के घट, फार्मा कंपन्यांचेही नुकसान

 

संदीप शिंदे

मंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या लाँकडाऊनच्या काळात केवळ औषध विक्री करणा-या दुकानांचे शटर कधीच डाऊन झाले नाही. या केमिस्टच्या दुकानांसमोर कायम रांगा दिसायच्या. मात्र, त्यानंतरही गेल्या ७० दिवसांत औषध विक्रीच्या प्रमाणात २५ ते ३० टक्के घट झाली आहे. केवळ हे किरकोळ विक्रेतेच नव्हे तर मोठमोठ्या फार्मा कंपन्यांनासुध्दा त्यामुळे तोट्यात गेल्याची माहिती हाती आली आहे.

देशातील औषध विक्री करणा-या कंपन्यांची वार्षिक उलाढाल सुमारे २ लाख २५ हजार कोटी आहे. त्यापैकी १८ टक्के म्हणजेच ४०, ५०० कोटींची औषध विक्री महाराष्ट्रात होते. त्यातही ५५ टक्के (सुमारे २२,३०० कोटी) व्यवसाय मुंबई महागनर क्षेत्रात मोडा-या मुंबई, ठाणे आण रायगड या जिल्ह्यातील आहे. उर्वरित महाराष्ट्रातील व्यवसाय त्या तुलनेत कमी (४५ टक्के) आहे. महाराष्ट्रात ७० हजार केमिस्ट कार्यरत आहेत. लाँकडाऊनच्या काळात या सर्व औषध विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी होती. कोरोनाची प्रचंड दहशत असल्याने या दुकानांतील निम्मे अधिक कर्मचारी कामावर येत नव्हते. त्यामुळे निम्या मनुष्यबळासह आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत ही दुकाने सुरू होती. दुकानांबाहेर औषध खरेदीसाठी कायम गर्दी असायची. मात्र, त्यानंतरही या वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची तुलना एप्रिल आणि मे महिन्याशी केल्यास औषधांच्या विक्रीत २५ ते ३० ट्क्के घट झाल्याचे स्पष्ट होत असल्याची माहिती आँल इंडिया आँर्गनायझेशन आँफ केमिस्ट अँण्ड ड्रगिस्टचे (एआयओसीडी) अध्यक्ष आ. जगन्नाथ शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 

लाँकडाऊनमुळे केमिस्ट कार्यरत असले तरी बहुसंख्य जनरल प्रॅक्टिशनर डाँक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. सरकारने वारंवार इशारे दिल्यानंतरही त्यापैकी अनेकांनी रुग्णसेवा सुरू केलेली नाही. त्याशिवाय रुग्णालयांतील कन्सल्टिंगही या कालावधीत बंद होते. त्यामुळे डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती. त्याशिवाय अनेक शस्त्रक्रीयासध्दा लांबणीवर टाकण्यात आल्या. त्यात अनेक रुग्णांचे हालही झाले. यासारख्या अनेक कारणांमुळे औषधांच्या विक्रीतही घट झाली आहे.

-    जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, एआयओसीडी

----

 

केमिस्टच्या खर्चात वाढ

औषध विक्रीत खंड पडू नये यासाठी कर्मचा-यांना दुप्पट वेतन देत काम करण्यासाठी प्रवृत्त करावे लागत होते. अनेक मालकांनी आपल्या कर्मचा-यांचा आरोग्य विमाही काढला. त्याशिवाय कर्मचारी कोरोना बाधित झाला तर त्याच्यावरील उपचार आणि अन्य कर्मचा-यांसाठी क्वारंटाईन व्यवस्थासुध्दा अनेक विक्रेत्यांनी केली. सामाजिक कर्तव्य म्हणून अनेकांनी सँनिटायझर्स, मास्क विनामुल्य वाटले. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढही  झाली. भायखळा येथील एक जेष्ठ औषध विक्रेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, जवळपास १०० कर्मचारी आणि मालकांना कोरोनाची लागण झाली. मात्र, ते ज्या परिस्थितीत काम करत आहेत त्या तुलनेत सुदैवाने ही ससंख्या कमी असल्याचे सांगत शिंदे यांनी समाधानही व्यक्त केले.

 

 

फार्मा कंपन्यांचे १२ टक्के नुकसान

गेल्या आर्थिक वर्षांतील सरासरी उलाढालीची तुलना एप्रिल महिन्यांतील लाँकडाऊनच्या काळाशी केल्यास १२ टक्के घट झाली आहे. २०१७ साली जीएसटी लागू झाल्यानंतरची ही सर्वात मोठी घट आहे. या कालावधीत मधुमेह आणि हृदय रोगाच्या आजारांवरील औषधांची विक्री वाढली आहे. तर, उर्वरित सर्व आजारांवरील औषध विक्री एक ते ३० टक्क्यांनी घटली आहे.                  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस