फटाक्यांच्या प्रदूषणाला पक्षी पडतात बळी
By Admin | Updated: November 15, 2015 01:40 IST2015-11-15T01:40:50+5:302015-11-15T01:40:50+5:30
दिवाळी उत्साहात, आनंदात साजरी झाली. यंदा शाळाशाळांतून झालेल्या जनजागृतीमुळे फटाक्यांचा धूमधडाका कमी झाला. पण तरीही फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाचा फटका पक्ष्यांना बसला आहे.

फटाक्यांच्या प्रदूषणाला पक्षी पडतात बळी
पूजा दामले, मुंबई
दिवाळी उत्साहात, आनंदात साजरी झाली. यंदा शाळाशाळांतून झालेल्या जनजागृतीमुळे फटाक्यांचा धूमधडाका कमी झाला. पण तरीही फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाचा फटका पक्ष्यांना बसला आहे. फटाक्यांमुळे हवेत पसरलेल्या वायूंमुळे अनेक पक्ष्यांना श्वासोच्छ्वासास त्रास जाणवल्याचे मत पक्षितज्ज्ञांनी नोंदवले आहे. मुंबईत तब्बल २७ पक्ष्यांना त्रास झाल्याची नोंद झाली आहे.
फटाक्यांतून निघणारा धूर, अथवा आकाशात उंच उडणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे पक्ष्यांना खूपच त्रास होतो. यामुळे हवेत पसरणाऱ्या प्रदूषणाचा फटका पक्ष्यांना बसतो. पक्ष्यांना फटाक्यांमुळे भाजल्याचा घटना घडत नाहीत, पण वायुप्रदूषणाचा फटका पक्ष्यांना बसतो, असे परळ येथील दी बाई सकाराबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर अॅनिमलचे (बैल घोडा) सचिव डॉ. जे.सी. खन्ना यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीत जखमी होणाऱ्या पक्षी, प्राण्यांची संख्या कमी झाली आहे. यंदा रुग्णालयात २५ पक्षी दिवाळीदरम्यान आले होते. त्यामध्ये कबुतर, घुबड, घार, पोपट या पक्ष्यांचा समावेश होता. फटाक्यांमुळे हवेत पसरलेल्या नायट्रोजनडाय आॅक्साइड, सल्फरडाय आॅक्साइडचा परिणाम पक्ष्यांच्या श्वसन यंत्रणेवर होतो. त्यामुळे काही पक्षी हे पडलेले आढळले. त्यानंतर लोकांनी त्यांना रुग्णालयात आणून सोडले. या पक्ष्यांवर उपचार म्हणजे ग्लुकोज किंवा मल्टी व्हिटॅमिन दिले जाते. फटाक्यामुळे जखमी झालेल्या ३ कुत्र्यांना आणि एका मांजराला रुग्णालयात दाखल केले आहे. चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. खन्ना यांनी दिली.
‘पॉज’ या पशुमित्र संघटनेने गेल्या ४ दिवसात दिवाळीतील फटाक्यांमुळे जखमी झालेला एक पोपट व कबुतरावर प्रथमोपचार केले. त्याचप्रमाणे प्रत्येकी दोन श्वान व सशांवर उपचार करण्यात आले. फटाक्यांमुळे हे प्राणी, पक्षी किरकोळ जखमी झाले होते.