कर्नाळा अभयारण्यातील जलाशय आटल्याने पक्ष्यांची भटकंती
By Admin | Updated: April 2, 2015 22:37 IST2015-04-02T22:37:40+5:302015-04-02T22:37:40+5:30
गोवा महामार्गालगत कर्नाळा पक्षी अभयारण्यात तलाव आणि बंधाऱ्याचं पाणी आटल्याने पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

कर्नाळा अभयारण्यातील जलाशय आटल्याने पक्ष्यांची भटकंती
वैभव गायकर, पनवेल
मुंबई - गोवा महामार्गालगत कर्नाळा पक्षी अभयारण्यात तलाव आणि बंधाऱ्याचं पाणी आटल्याने पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. अभयारण्य प्रशासनाकडून पक्ष्यांकरिता ठिकठिकाणी कुंड्या ठेवल्या आहेत. परंतु इतक्या मोठ्या क्षेत्रासाठी आणखी प्रभावी यंत्रणा राबविण्याची आवश्यकता असल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. त्यासाठी सामाजिक संघटनांनी देखील पुढाकार घेण्याची गरज आहे.
पनवेल शहरापासून १२ किमी अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. याठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळयाप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. निसर्गरम्य परिसर आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय, रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बिहरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात. दरम्यान, कडक उन्हामुळे हे पक्षी आता अडचणीत सापडले आहेत. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अभयारण्य परिसरात पक्ष्यांसाठी तीन तलाव खोदण्यात आले असले तरी अगदी मार्च महिन्याच्या मध्यंतरालाच या तलावांचा तळ उघडा पडला आहे. त्यामुळे अभयारण्यात गेल्या काही दिवसापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावात गाळ साठल्याने जलाशय उथळ होत असून फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याचा साठा कमी होत जातो. दरम्यान, संपूर्ण अभयारण्यात पाण्यासाठी एक बोअरवेल असून पाइपलाइनच्या माध्यमातून विश्रामगृहापर्यंत पाणी नेले जात आहे. १२ किमी क्षेत्र असलेल्या या अभयारण्यात २७ कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र ही संख्या अपुरी असल्याचे पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.