बर्ड फ्लू नियंत्रणात : आपल्या परिसरातील तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:06 IST2021-01-21T04:06:53+5:302021-01-21T04:06:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको, काळजी घ्या, या विषाणूचा प्रसार पक्ष्यांचे मांस, ...

बर्ड फ्लू नियंत्रणात : आपल्या परिसरातील तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे कळवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको, काळजी घ्या, या विषाणूचा प्रसार पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही, अशी माहिती देतानाच आपल्या परिसरात जलाशय, तलाव असतील; या तलावांत पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे कळवा, असे आवाहन वनविभाग, पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
मुंबई आणि राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूबाबत प्रकरणे नोंदविण्यात येत आहेत. मुंबईच्या तुलनेत राज्यात हे प्रमाण अधिक आहे. गेल्या काही दिवसांत पक्षी मृत होण्याचा आकडा नियंत्रणात असला तरीही हा आकडा वाढू नये आणि नुकसान होऊ नये म्हणून वनविभाग काम करीत आहे.
पक्ष्यांच्या स्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते, अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा.
कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करा. आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.