कामे न तपासताच होतात येथे बिले अदा
By Admin | Updated: May 6, 2015 01:19 IST2015-05-06T01:19:42+5:302015-05-06T01:19:42+5:30
जव्हार पंचायत समितीचे सहाय्यक अभियंता डी.सी. जाधव यांचा मनमानी कारभार सुरू असून छोट्या ठेकेदारांकडून टक्केवारी उकळण्याचे सत्र त्यांच्याकडून सुरू असल्याची तक्रार आहे.

कामे न तपासताच होतात येथे बिले अदा
हुसेन मेमन, जव्हार
जव्हार पंचायत समितीचे सहाय्यक अभियंता डी.सी. जाधव यांचा मनमानी कारभार सुरू असून छोट्या ठेकेदारांकडून टक्केवारी उकळण्याचे सत्र त्यांच्याकडून सुरू असल्याची तक्रार योगेश रजपूत आणि इतर ठेकेदारांनी केली आहे. ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी जव्हार पंचायत समिती बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता १० टक्के, उपअभियंता ८ टक्के, कनिष्ठ अभियंता ५ टक्के अशी टक्केवारी द्यावी लागते. असे या ठेकेदारांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या विभागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आरोग्य केंद्राची दुरूस्ती, मोऱ्या, साकव बांधणे अशा विविध कामांसाठी करोडोंचा निधी दरवर्षी येत असतो. यात सहाय्य अभियंता जाधव हे मोठ्या ठेकेदारांकडून आर्थिक व्यवहार करून कामांची तपासणी न करताच बिले अदा केली जातात. मात्र छोट्या ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी त्यांची चांगलीच पिळवणूक केली जाते. तसेच त्यांनी किरकोळ दुरूस्तीचे देयक अदा करण्यासाठी झालेली कामेही तपासली. परंतु अद्यापही देयके देण्यास टाळाटाळ सुरू असल्याची या ठेकेदारांची तक्रार आहे.
आम्ही घाम गाळून, कर्ज काढून कामे पूर्ण करतो, परंतु त्याचे बिल न मिळाल्याने आमची चांगलीच कोंडी झाली आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे वेळेवर देयके न मिळाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे ठेकेदार सांगतात. यामुळे आम्हाला आर्थिक व मानसिक दोन्ही त्रास सहन करावा लागत आहे. या अडवणुकीमुळे ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे. कामे पूर्ण होण्याआधीच सहाय्यक अभियंता डी.सी. जाधव यांनी त्यांची टक्केवारीही आम्ही ठेकेदारांकडून आगाऊ मागितल्याचेही ठेकेदारांनी म्हटले आहे.
(क्रमश:...)
यांच्या अटीच फार...
४कामे तपासण्यासाठी जायचे आहे, फोर व्हिलर घेऊन ये, अशी कारणे दिली जातात. वास्तविक पहाता झालेली कामे तपासायलाच पाहिजे यात शंका नाही, परंतु त्यातही विशिष्ट ठेकेदारांची कामे तपासायची, तीही ठेकेदाराच्या गाडीतून हा कुठला नियम? यावर कळस म्हणजे त्यांनी आमच्याकडून जबरीने टक्केवारी आगाऊ द्या नाहीतर तुमच्या बिलावर आक्षेप घेऊन देयके रखडवून टाकेन, असे धमकावले.
४त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही सर्व टक्केवारी या अधिकाऱ्यांना आगाऊ देऊन टाकली आणि रक्कम देताना त्यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही आमच्याकडे असल्याचे हे ठेकेदार सांगतात.
मी त्या ठेकेदारांकडून कुठलेच पैसे घेतलेले नाही, त्यांनी केलेल्या कामाची तपासणी आम्ही केलेली आहे. त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यावर देयक अदा करण्यात येईल.
- डी. सी. जाधव, सहाय्यक अभियंता, पंचायत समिती सार्वजनिक
बांधकाम विभाग, जव्हार.