Join us

यशवंत जाधवांच्या घरी कोट्यवधींचे घबाड; १० बँक खाती प्रतिबंधित, १५ कोटींचे कमिशन घेतल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 05:54 IST

३३ ठिकाणच्या झाडाझडतीत एकूण दोन कोटींच्या रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरात सलग तिसऱ्या दिवशी प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असून, ३३ ठिकाणच्या झाडाझडतीत एकूण दोन कोटींच्या रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली. तसेच १० बँक खात्यांवरही निर्बंध आणत यांतील व्यवहारांचा लेखाजोखा तपासण्यात येत आहे. 

प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या  माहितीनुसार, आतापर्यंत कागदपत्रांसह डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. यामध्ये जाधव यांच्यासह गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल, पाच सिव्हिल कंत्राटदार यांच्यातील व्यवहाराची आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. अग्रवाल हा जाधव यांचा जवळचा आहे. यामध्ये कुठे आणि किती रुपयांची कर चुकवेगिरी झाली आहे? याचा शोध प्राप्तिकर विभागाकडून घेण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी ट्विट करीत जाधव यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

१५ कोटींचे कमिशन घेतल्याचा संशय

- यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष असल्याने वर्षाला विविध गोष्टींसाठी हजारो कोटींचे प्रस्ताव संमत केले जातात. 

- जाधव यांनी २०१८ ते २०२० दरम्यान कंत्राटदारांकडून जवळपास १५ कोटींचे कमिशन, लाच मिळवून पुढे हे पैसे शेल कंपनीमध्ये गुंतविल्याचा संशय आहे.

टॅग्स :यशवंत जाधवमुंबईइन्कम टॅक्स