सर्वसामान्यांना गंडा घालून रिक्षाचालक बनला कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:47 AM2019-09-18T01:47:22+5:302019-09-18T01:47:24+5:30

पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांना गंडा घालून एक रिक्षाचालक कोट्यधीश बनल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे.

The billionaire became a rickshaw driver by messing up the common people | सर्वसामान्यांना गंडा घालून रिक्षाचालक बनला कोट्यधीश

सर्वसामान्यांना गंडा घालून रिक्षाचालक बनला कोट्यधीश

Next

मुंबई : पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांना गंडा घालून एक रिक्षाचालक कोट्यधीश बनल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. हारून शेख असे आरोपीचे नाव आहे. केजीएन नावाची कंपनी स्थापन करून त्याने अनेकांची फसवणूक केली. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी सोमवारी शेखसह त्याची आई हलिमा आणि मुलगी निलोफर यांना अटक केली. त्याचा साथीदार नितेश मोरे पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हारून शेख याने रिक्षाचालक असताना भिसीद्वारे गुंतवणूक सुरू केली. बरेच जण यात उत्सुकता दाखवित असल्याचे पाहून त्याने दोन वर्षांपूर्वी केजीएन नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीद्वारे तो पैसे दुप्पट करून देत असे. सुरुवातीच्या काळात पैसे हाती येत असल्याने गुंतवणूकदारांची संख्या वाढली. यात, काहींनी पैशांसाठी घरावर कर्ज घेत ती रक्कम शेखकडे गुंतवली. तर, अनेकांनी दागिने गहाण ठेवूनही यात गुंतवणूक केली होती.
गेल्या वर्षभरात हारूनकडून पैसे येणे बंद झाले. तक्रारदारांनी भांडुप पोलिसांकडे धाव घेतली. मात्र लेखी तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. अखेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांनी गुंतवणूकदारांची समजूत काढून त्यांना लेखी तक्रार देण्यासाठी तयार केले. दहा दिवसांपूर्वी या प्रकरणी शेखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री तो भांडुपमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे या प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.
त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीत, नागरिकांकडून घेतलेले पैसे त्याने दुप्पट होण्यासाठी दुसरीकडे गुंतविले. त्यात त्याला नुकसान सहन करावे लागल्याने नागरिकांना देण्यासाठी पैसे मिळाले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत. आतापर्यंत १५ ते २० तक्रारदार पुढे आले आहेत. शेखने शेकडो जणांना गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांचेही पैसे अडकले
पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडत काही पोलिसांनीदेखील यात गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काही जण अजूनही तक्रारीसाठी पुढे येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>गँगस्टरच्या प्रेयसीकडून धमकी
एका कुख्यात गँगस्टरच्या प्रेयसीनेही यात पैसे गुंतविल्याचे समते. काही दिवसांपूर्वी ती बाऊन्सरला घेऊन शेखच्या घरी धडकली. बंदुकीचा धाक दाखवून पैसे परत करण्यासाठी त्याला धमकाविले असल्याचीही माहिती समजते.

Web Title: The billionaire became a rickshaw driver by messing up the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.