विरुद्ध दिशेने याल तर बाईकस्वारांनो खबरदार !
By Admin | Updated: November 17, 2014 01:12 IST2014-11-17T01:12:56+5:302014-11-17T01:12:56+5:30
वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे सांगत मुंबई वाहतूक पोलिसांनी बाईकस्वारांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे

विरुद्ध दिशेने याल तर बाईकस्वारांनो खबरदार !
मुंबई : वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे सांगत मुंबई वाहतूक पोलिसांनी बाईकस्वारांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. परवानगी नसतानाही विरुद्ध दिशेने बाईक चालवून नियम मोडणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या १९२ जणांवर वाहतूक पोलिसांवर कारवाई केली आहे. एका विशेष मोहिमेद्वारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सध्या बाईकस्वारांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्याचबरोबर ते अनेकदा अपघातांसही कारणीभूत ठरत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या रस्त्यांवर वाहने धावत असताना विरुद्ध दिशेने बाईक चालवण्यास मनाई असते, अशा ठिकाणीही बाईकस्वार नियम मोडताना दिसतात. अशा बाईकस्वारांविरोधात ३ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत कारवाईची एक विशेष मोहीम सुरू केली.
यामध्ये विरुद्ध किंवा चुकीच्या दिशेने येणाऱ्या-जाणाऱ्या बाईकस्वांराविरोधात १८४ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली गेली. या कारवाईत १९२ जणांना पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करतानाच बाईकही जप्त करण्यात आली. याबाबत सह पोलीस आयुक्त (वाहतूक) बी. के. उपाध्याय यांनी सांगितले की, या बाईकस्वारांमुळे अन्य बाईकस्वार किंवा पादचाऱ्यांना मोठा त्रास होतो. हे पाहता अशा बाईकस्वरांविरोधात गुन्हा दाखल करतानाच बाईक जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)