मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइल्ड लाईफ श्रेणीतील ‘शूट आॅफ द फ्रेम’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त छायाचित्रकार बैजू पाटील यांना नुकताच जाहीर झाला आहे. जगभरातून १७,५०० फोटो स्पर्धेसाठी आले होते. त्यात बैजू पाटील यांनी बाजी मारली. डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलिया पुरस्काराचे वितरण होईल. सुवर्णपदक, रोख दीड लाख रुपये व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.रणथंबोर (राजस्थान) येथे भटकंतीवेळी त्यांनी हे छायाचित्र टिपले आहे. पुरस्कारप्राप्त छायाचित्रात एक मोर सकाळच्या ढगाळ वातावरणात पिसारा फुलवून नाचत असताना दोन अस्वल त्याच्यासमोरून जात होती. दुसरे अस्वल जात असताना पर्यटकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे ते भयभीत होऊन मोरासमोरच थांबले. छायाचित्रात असे वाटते की, अस्वलाचाच तो पिसारा आहे. बैजू पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात हे दुर्मिळ छायाचित्र टिपले. हा फोटो फाइन आर्टस् श्रेणीतील असल्याचे भासते. छायाचित्रकार बैजू पाटील हे वन्यजीवसृष्टी वाचवण्यासाठी शाळा-महाविद्यालये व ठिकठिकाणी प्रबोधन करीत आहेत.हे छायाचित्र इतके सुंदर येईल, याची मी कल्पनाही केली नव्हती. या पुरस्काराने मला मनस्वी समाधान झाले आहे. भारत सरकारचा कलाकांराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. कलेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.- बैजू पाटील, मुक्त छायाचित्रकार
‘शूट आॅफ द फ्रेम’ पुरस्काराने बैजू पाटील यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 06:41 IST