सिडको स्मार्ट सिटीत सर्वाधिक गुंतवणूक

By Admin | Updated: November 29, 2015 00:36 IST2015-11-29T00:36:59+5:302015-11-29T00:36:59+5:30

केंद्र सरकारने देशातील १०० शहरांची या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी निवड केली असून, त्यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे़ मात्र, स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश नसतानाही

The biggest investment in the CIDCO Smart City | सिडको स्मार्ट सिटीत सर्वाधिक गुंतवणूक

सिडको स्मार्ट सिटीत सर्वाधिक गुंतवणूक

केंद्र सरकारने देशातील १०० शहरांची या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी निवड केली असून, त्यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे़ मात्र, स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश नसतानाही सिडकोने ‘साऊथ नवी मुंबई’ नावाची स्मार्ट सिटी विकसित करण्याचा निर्णय घेतला़ १० महिन्यांच्या अथक तयारीनंतर या स्मार्ट सिटीचे काम सुरू केले आहे़ या स्मार्ट सिटीच्या काही कामांचा शुभारंभ एका विशेष फेस्टद्वारे येत्या ४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख समीर शर्मा यांच्यासह देशभरातील ज्या १०० शहरांची निवड स्मार्ट सिटीसाठी आहे, त्यांच्या प्रमुखांना बोलाविले आहे. यानिमित्ताने सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याशी ‘लोकमत’ने केलेली बातचित.

सिडकोची १९७१ साली स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ, बेलापूर या ७ नोडचा पूर्ण विकास करून ते नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत़ आता उर्वरित खारघर, कळंबोली, कामोठे, उलवे, द्रोणागिरी, पनवेल आणि पुष्पकनगर या अर्धविकसित नोडचा म्हणावा तसा विकास झालेला नाही़ अद्याप त्या भागात अनेक सुविधांची वाणवा आहे़ त्यामुळे या नोडच्या परिसरात सिडकोने ‘साऊथ नवी मुंंबई’ अंतर्गत स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे़ ‘नैना’शी या स्मार्ट सिटीचा काहीही संबंध नाही़ नैना हे स्वतंत्र शहर राहणार आहे़ सुमारे ५६१ चौरस किलोमीटर क्षेत्रात ते विकसित होणार असून, राजधानी मुंबईपेक्षा ते कितीतरी मोठे राहणार आहे़तसेच नैनाच्या पहिल्या टप्प्यात २३ गावांत पायलेट प्रोजेक्ट म्हणून जे शहर विकसित केले जाणार आहे, त्याच्याशीही या स्मार्ट सिटीचा तिळमात्रही संबंध राहणार नाही़ परंतु, सध्याच्या उपरोक्त अर्धविकसित ७ नोडमध्ये सिडको ही स्मार्ट सिटी विकसित करीत आहे, तिची सध्याची लोकसंख्या ६ लाख २० हजार आहे़ येत्या काही वर्षांत ती २० लाख होईल, असे गृहीत धरून या स्मार्ट सिटीचा विकास करण्यात येणार आहे़
या शहरास स्मार्ट सिटीपर्यंत आणण्यासाठी २ हजार कोटी, पायाभूत सुविधांवर २० हजार कोटी अशी २२ हजार कोटींची कामे सिडको स्वत: करणार असून, त्यातील काही कामांना सुरुवातही झाली आहे़ शिवाय येत्या चार वर्षांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६ हजार कोटी, जेएनपीटी परिसर विकसित करण्यासाठी ८ हजार कोटी, राष्ट्रीय महामार्ग विकासावर ४ हजार कोटी, सर्वसामान्यांसाठीच्या घरांवर ११ हजार कोटी आणि नवी मुंबई मेट्रोच्या विस्तारीकरणावर ११ हजार कोटी अशी ५० हजार कोटींची सार्वजनिक गुंतवणूक या परिसरात येत्या चार वर्षांत होणार आहे़ हे या स्मार्ट सिटीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून यातून सुमारे ८ लाख २७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे भाटिया यांनी स्पष्ट केले़
येत्या चार वर्षांत या स्मार्ट सिटीवर सिडको स्वत:चे सुमारे २२ ते २४ हजार कोटी आणि सार्वजनिक गुंतवणूक ५० हजार कोटी मिळून ७४ हजार कोटी खर्च करणार आहे़ यामुळे सिडकोची ही स्मार्ट सिटी राज्य व केंद्राची मदत न घेता राज्यच नव्हे, तर देशातील आदर्श अशी स्मार्ट सिटी राहणार असल्याचा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात निवड केलेल्या १०० शहरांचे काम सध्या प्राथमिक स्तरावर आहे़ येत्या ८ महिन्यांत स्पेशल पर्पज व्हेईकल नेमल्यानंतर त्यांच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे़ यात नवी मुंबई महापालिकेचाही समावेश आहे़ त्याचे आपण मेंटॉर आहोत़ मात्र, त्यापेक्षा वेगळी आणि सर्व पायाभूत सुविधांनी युक्त अशी स्वबळावर कोणाचीही मदत न घेता अत्याधुनिक अशी स्मार्ट सिटी विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यावर सिडकोने या स्मार्ट सिटीचे काम सुरू केल्याचे भाटिया यांनी सांगितले़ त्यानुसार गेल्या १० महिन्यांत सर्वअंगाने ६८ परिणामांवर तयारी करून सिडकोने आपल्या कामास सुरुवात केली आहे. ४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या फेस्टमध्ये ५० विविध स्टॉलद्वारे सिडको आपल्या स्मार्ट सिटीचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) सादर करणार आहे़ यातून देशभरातील त्या त्या शहरांनी काहीतरी संकल्पना घ्यावी, हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़

नऊ पिलरचा सर्वांग विचार करून ही स्मार्ट सिटी विकसित होणार आहे़ सिडको ज्या
६८ मुद्द्यांवर भर देऊन स्मार्ट सिटी विकसित करणार आहे, त्यांचा नऊ प्रमुख पिलरमध्ये समावेश केला आहे़ त्यावरच जास्त भर दिला जाणार आहे़ यात सिडकोने स्वत:चे सॉफ्टवेअर विकसित करून सॅप प्रणालीचा शुभारंभ केला आहे़ इ-गर्व्हनन्सवर भर देऊन पेपरलेस कारभारावर भर दिला आहे़ बहुतेक काम आॅनलाइन सुरू केले आहे़ आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी सिडको अनेक प्रकल्प राबविणार आहे़ प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के योजनेच्या निपटाऱ्यासह सर्व कामे आॅनलाइन सुरू केली आहेत़ या स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विविध प्रकल्पांसाठी ४० मुद्द्यांचा अभ्यास करून आॅनलाइन सीसी/ओसी देण्यात येणार आहे़ यात पारदर्शकतेवर अधिक भर दिला आहे़

याशिवाय समाजमंदिरे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नाट्यगृह बांधण्यात येणार आहे़ सुमारे ६० उद्याने आणि ६० मैदाने, फाउंटन, विकसित करून शहराच्या सौंदर्यात भर घालण्यात येईल.खाडीकिनारी मरिना विकसित करणे, गाढी नदीवर रिव्हर फ्रन्ट डेव्हल्पमेंट प्रकल्प विकसित करणे, बेलापूर किल्ल्याचे संवर्धन करणे, अशा अनेक प्रकल्पांची उभारणी या चार वर्षांत करण्यात येणार आहे़ ट्रान्झिट ओरीएन्टेड डेव्हलपमेंट अंतर्गत घराशेजारीच किंवा घरापासून काही अंतरावर कार्यालय असावे हे गृहीत धरून नवी मुंबई मेट्रोचा फेज-१, फेज-२, फेज-३ नियोजन करून त्यादृष्टीने परिसराचा विकास करण्यात येणार आहे़ याशिवाय बस सेवा सुरू करणे, बस स्थानक, बस थांबे बांधण्यात येणार आहेत़ शिवाय वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करून स्मार्ट सिटीच्या विकासात भर घालण्यात येणार आहे़ या सर्वांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे़

या परिसरात सर्वसामान्यांसाठी अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटातील ५५ हजार घरे बांधण्यात येणार असून, त्यांच्या किमती माफक राहणार आहेत़ त्यात नफा कमाविणे हा सिडकोचा उद्देश नसून जमिनींची किंमत त्यातून वसूल केली जाणार नाही़ केवळ जो बांधकाम खर्चच वसूल केला जाणार आहे़ यावर सिडको ११ हजार कोटी रूपये खर्च करणार असल्याचे भाटिया यांनी स्पष्ट केले़ नवी मुंबई परिसरात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीचा विकास आणि सेझ प्रकल्प गृहीत धरून सिडको येत्या काळात एव्हीएशन अकादमी आणि पोर्ट अकादमी सुरू करणार आहे़ त्यात प्रकल्पग्रस्तांना विशेष प्रशिक्षण देऊन या प्रकल्पांमध्ये त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हाच उद्देश आहे़

स्मार्ट सिटीतील रहिवाशांचे जीवनमान उंचावे तसेच सुरक्षिततेवर भर देण्यात येणार आहे़ यासाठी १८० कोटी रुपये खर्चून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, त्यांची क्षमता सध्या मुंबई शहरात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे़ कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालयात राहणार असून, तेथे दोन रूम असणार आहेत़ यात एक पोलिसांच्या कामाशी निगडित आणि दुसरा सिडकोशी निगडित असून, जीपीएस आणि जीआयएसद्वारे नागरिकांना हवी ती माहिती मिळण्यास मदत होणार आहे़
याशिवाय या परिसरात नैनासह सेझ, जेएनीपीटीशी निगडित वेगळे लॉजिस्टीक पार्क विकसित होत आहेत. तसेच न्हावा-शेवा सीलिंक, जेएनपीटी ते दिल्ली कॉरिडॉर विकसित होत आहे़ त्याचाही बुस्टर सिडकोच्या या स्मार्ट सिटीला मिळणार आहे़ यामुळे सिडकोची ही स्मार्ट सिटी देशातील त्या शंभर स्मार्ट सिटीपेक्षा आदर्श असेल, त्यात इ-गव्हर्नन्ससह सर्व पायाभूत सुविधा असतील़ सर्वांत जास्त गुंतवणूक (६४ हजार कोटी) आणि सर्वांत जास्त रोजगार (८ लाख २७ हजार) देणारे हे एकमेव शहऱ आगामी २० वर्षांच्या वाढीचा विचार करून ते विकसित केलेले एकमेव स्मार्ट शहर असेल, असा दावा संजय भाटिया यांनी केला.
पर्यावरण संवर्धनासाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण खात्याच्या सर्व अटीशर्थींचे पालन करून सिडको खारघर येथे एक नेचर पार्क आणि पसिरात दोन मँग्रोज पार्क विकसित करणार आहे़ हे दोन्ही प्रकल्प वन विभागाला सोबत घेऊन पूर्ण केले जाणार असून, यातील नेचर पार्कच्या कामाला सुरुवातही झाली आहे़

- शब्दांकन : नारायण जाधव

Web Title: The biggest investment in the CIDCO Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.