वार्षिक कला प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

By Admin | Updated: February 17, 2017 02:36 IST2017-02-17T02:36:55+5:302017-02-17T02:36:55+5:30

माझे अभिनय क्षेत्रातील यशाचे श्रेय याच कला महाविद्यालयाला जाते, अशी प्रतिक्रिया अभिनेते मनोज जोशी यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी

Big response to the annual art exhibition | वार्षिक कला प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

वार्षिक कला प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

मुंबई : माझे अभिनय क्षेत्रातील यशाचे श्रेय याच कला महाविद्यालयाला जाते, अशी प्रतिक्रिया अभिनेते मनोज जोशी यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयात ८२व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते झाले.
सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला रसिकांनी गर्दी केली होती. त्यात राज्यातील चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी व अभ्यासकांची मोठी संख्या आहे. संस्थेतील बॅचलर इन फाईन आर्ट (बीएफए) या अभ्यासक्रमाच्या प्रथम ते अंतिम वर्षाच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या २ हजार कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. यंदाही पहिल्या दिवसापासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विविध ठिकाणांहून रसिक व अभ्यासक येत आहेत. रेखांकन, अर्कचित्रे, व्यंगचित्रे, कॉमिक्स, शैलीदार चित्रे, व्यक्तिचित्रे, अ‍ॅनिमेशन, बॅकग्राउंड रेंडरिंग, कलर रेंडरिंग, वस्तुचित्रांकन, छायाचित्रण, स्थिर छायाचित्रण, चलचित्रांकन, टायपोग्राफी, अक्षर सुलेखन, तैलचित्रे अशा विविध रंग व तंत्र माध्यमांतील कलाकृती प्रदर्शनात आहेत. त्याचप्रमाणे, जाहिराती, नियतकालिकांची रचना, मजकुराची रचना, बुक मार्कर, पॅकेज डिझायनिंग आदी माध्यम प्रकारांतील प्रयोगही प्रदर्शनात पाहावयास मिळतील. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या काही अनोख्या कलाकृतीही प्रदर्शनात आहेत. यावेळी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी कार्यशाळा घेण्याचा मनोदय प्रॉडक्शन डिझायनर शशांक तेरे यांनी व्यक्त केला. उत्कृष्ट कलेसाठी राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी रिया शहा, सलोनी मेस्त्री व अनुभव जाधव यांची निवड झाली. हे प्रदर्शन संस्थेच्या इमारतीत १९ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Big response to the annual art exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.