महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि जगभरात नावलौकिक असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांवर एक गंभीर चूक झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे लाखो प्रमाणपत्रं बाद झाली असून, ही प्रमाणपत्रं मागे घेऊन संबंधित विद्यार्थ्यांना नवी प्रमाणपत्रं देण्यात येणार असल्याचं मुंबई विद्यापीठानं जाहीर केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई विद्यापीठाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील पदवी प्रमाणपत्रांवरील मुंबई विद्यापीठाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या नावातील मुंबई नावाचं स्पेलिंग चुकलं असून, तिथे Mumbai ऐवजी Mumabai असं स्पेलिंग छापलं गेलं आहे. या चुकीचा फटला लाखो विद्यार्थ्यांना बसला असून, या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये मुंबई विद्यापीठामधून सुमारे १.६४ लाख विद्यार्थ्यांनी पदवी मिळवली आहे. मात्र यापैकी किती विद्यार्थ्यांना चुकीची प्रमाणपत्रं मिळाली आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, विद्यापीठाचं नाव टाईप करताना झालेल्या गफलतीमुळे ही चूक झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून या चुकीबाबत दिलगिरी व्यक करण्यात आली आहे. तसेच चुकीची प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुधारित प्रमाणपत्रं दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ही प्रमाणपत्रे कुठलंही अतिरिक्त शुल्क न आकारता दिली जातील, अशी माहितीही देण्यात आली आहे.