Mumbai Local Train News: आताच्या घडीला मुंबईतील लोकलवर अधिक भार येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे यांवरील ताण वाढत आहे. दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत आहे. एकीकडे एसी लोकलला चांगला प्रतिसाद आहे, एसी लोकल वाढवण्याचा विचार केला जात आहे, असे असले तरी दुसरीकडे एसी लोकलला होणारा विलंब प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यातच केंद्राकडून मुंबई उपनगरीय सेवांसाठी अतिरिक्त मदत देणार असल्याचे म्हटले जात आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली की, सीमावर्ती भागांमधील संपर्क वाढवण्यासाठी नवीन रेल्वे मार्गांसाठी सर्वेक्षण केले जात आहे. या उपक्रमांमुळे आधुनिक संपर्काला चालना मिळेल आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित, अधिक सोयीस्कर आणि उत्तम प्रवासाचा अनुभव मिळेल.
मुंबई लोकलसाठी केंद्राची ३ हजार कोटींची अतिरिक्त मदत
मुंबई उपनगरीय रेल्वे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी स्वयंचलित दरवाजा बंद करण्याच्या प्रणालीने सुसज्ज असलेल्या २३८ नवीन उपनगरीय गाड्या बांधल्या जात आहेत. मुंबई उपनगरीय सेवेतील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सरकार सुमारे ३,००० कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देत आहे, असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.
भारताच्या पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे काम प्रगतीपथावर
बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत ३०० किमी पेक्षा जास्त लांबीच्या व्हायाडक्टचे बांधकाम पूर्ण झाले असून, पियर बांधकाम, ट्रॅक टाकणे आणि स्थानक विकासाचे काम सुरू आहे. भारताच्या पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे कामही प्रगतीपथावर आहे.
दरम्यान, या प्रकल्पात ४३५ किमी पायाभूत काम, ३३८ किमी गर्डर बसवणे, १६८ किमी ट्रॅक टाकणे आणि ओएचई (OHE) बसवणे यांचा समावेश आहे. वापी, बिलिमोरा, सुरत आणि बीकेसी (BKC) यांसारख्या अनेक स्थानकांवरील काम पूर्णत्वाकडे वेगाने प्रगती करत आहे. या प्रकल्पांतर्गत अनेक नद्यांवरील पूल पूर्ण झाले असून, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती या भागांमध्ये काम वेगाने सुरू आहे.