Join us
Daily Top 2Weekly Top 5

Big Boss 14 Video: यापुढे अशी चूक होणार नाही, मराठी माणसांची माफी मागतो; जान कुमार सानूचा माफीनामा

By प्रविण मरगळे | Updated: October 29, 2020 07:44 IST

Big Boss 14, Jan Kumar Sanu Controversy on Marathi News: बिग बॉस १४ च्या मंगळवारी एपिसोडमध्ये जेव्हा शोचे स्पर्धक राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी मराठी भाषेत बोलत होते तेव्हा जान कुमार सानूने त्यास विरोध केला

ठळक मुद्देमला मराठी भाषेची चीड येते, जान कुमार सानूच्या या वक्तव्याने मराठी माणसांमध्ये संताप जान कुमार सानूच्या वादग्रस्त विधानानंतर मनसे, शिवसेनेचा आक्रमक पवित्राकलर्स वाहिनीने पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागितली माफीबिग बॉस शोमध्ये जान कुमार सानूला चुकीची जाणीव करून देत माफी मागण्यास पाडलं भाग

मुंबई - टीव्ही रियलिटी शो बिग बॉस १४ मध्ये आता हळूहळू वादविवाद वाढू लागले आहेत. पण अलीकडेच या शोचे स्पर्धक आणि गायक जान कुमार सानू याने मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जान याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी २४ तास दिले होते. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.

यावेळी जान कुमार सानू म्हणाला की, मी नकळत एक चूक केली त्यामुळे मराठी माणसांच्या भावनाला धक्का लागला, मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं त्याने सांगितले.

खरं तर, बिग बॉस १४ च्या मंगळवारी एपिसोडमध्ये जेव्हा शोचे स्पर्धक राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी मराठी भाषेत बोलत होते तेव्हा जान कुमार सानूने त्यास विरोध केला. तो म्हणाला की, मराठी भाषेमुळे मला चीड येते. हिंमत असेल तर हिंदीत बोला. याबाबत मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियातही अनेकांनी जान कुमार सानूच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. वाद वाढत असतानाच कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंग्रजी भाषेत पत्र पाठवून माफी मागितली. तरीही मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. २४ तासात जान कुमार सानूने माफी मागितली नाही तर बिग बॉसचं शूट बंद करू तसेच जान कुमार सानूला यापुढे काम कसं मिळतं ते पाहू असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी दिला होता. सानूला लवकरच थोबडवणार, अशी थेट धमकी मनसेने दिली होती.

२७ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडसंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित भाग सर्व एपिसोड्समधून काढून घेण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषांचा आम्ही सन्मान करतो,' असं कलर्सनं मराठी भाषेत राज ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. त्याचवेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनीही विधान केले की देशातला कोणीही कोणत्याही भाषेत बोलण्यास नकार देऊ शकत नाही.

बिग बॉसमध्ये नेमके काय झाले?

बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून 'जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दांत मनसेचे अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला होता.

टॅग्स :बिग बॉस १४मराठीमनसेशिवसेना