सायकल चालवा, शहर वाचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:56+5:302020-12-05T04:09:56+5:30

सायकल... प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले हक्काचे वाहन. बालपणाची साथीदार असलेली सायकल कालांतराने दुरावत जाते. कॉलेज जीवनात लागलेली बाइकची धुंदी ...

Bicycle, save the city! | सायकल चालवा, शहर वाचवा!

सायकल चालवा, शहर वाचवा!

सायकल... प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले हक्काचे वाहन. बालपणाची साथीदार असलेली सायकल कालांतराने दुरावत जाते. कॉलेज जीवनात लागलेली बाइकची धुंदी आणि त्यानंतर घड्याळ्याच्या काट्यावर धावताना आपली पहिली साथीदार, धूळ खात पडलेली असते. असे असले तरी कुठेतरी मनाच्या कप्प्यामध्ये ही सायकल आपले स्थान कायम राखून असते.

फिटनेसच्या दृष्टीने का होईना, पुन्हा एकदा सायकलवर स्वार होण्याची इच्छा अनेकांना होत असते. कोरोना महामारीच्या काळात तर सायकलने सर्वांनाच बालपणीच्या आठवणीत नेले. ‘वर्क फ्रॉम होम’दरम्यान एका ठिकाणी तासन् तास बसून काम करत असल्याने फिटनेसची चिंता होणारच. त्यामुळेच अनेकांनी आपल्या सायकली पुन्हा एकदा रस्त्यावर पळवल्या. काहींनी तर नव्याने खरेदी केल्या. लॉकडाऊनमध्ये सायकलिंगचे प्रमाण इतके वाढले की कधी नव्हे, ते सायकलसाठी ‘वेटिंग’ लागले.

या अचानक झालेल्या बदलामुळे, एका मोहिमेला मात्र मोठे बळ मिळाले. ही मोहीम म्हणजे ‘सायकल चला, सिटी बचा’. लोकांनी सायकलचा जास्तीतजास्त वापर करून तंदुरुस्ती राखण्यासोबतच पर्यावरणाचा समतोलही राखावा या उद्देशाने सुमारे ३ महिन्यांपूर्वी या मोहिमेची सुरुवात मुंबईत झाली. अनुभवी सायकलिस्ट फिरोझा सुरेश यांच्या नेतृत्वात मुंबईत सुरू झालेल्या या मोहिमेत त्या स्वत: मुंबईच्या सायकलिंग मेयर असून मुंबईच्या प्रत्येक वॉर्डनुसार एक असे एकूण २४ सायकलिंग काऊन्सिलर्स नियुक्त केले आहेत.

आपल्याला स्वत:च्या वॉर्डमधील बऱ्याच गोष्टींची माहिती नसते. मात्र सध्या हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न हे विविध काऊन्सिलर्स सायकलिंगच्या माध्यमातून करीत आहेत. सायकलिंगद्वारे तंदुरुस्ती राखतच आपल्या विभागाचीही पूर्ण माहिती करून घ्यावी, हे पहिले लक्ष्य प्रत्येक काऊन्सिलरने बाळगले आहे. ही मोहीम नेमकी आहे तरी काय? यामागचा उद्देश काय? लक्ष्य काय? सध्या किती सायकलिस्ट यामध्ये सहभागी झाले आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही यानिमित्ताने जाणून घेतली.

यासाठी आम्ही आर मध्य वॉर्डचे सायकलिंग काऊन्सिलर राकेश देसाई यांना बोलते केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ८ वर्षांपासून सायकलिंग करीत असलेल्या फिरोझा यांच्या नेतृत्वात सध्या मुंबई शहर व उपनगरामध्ये ‘सायकल चला, सिटी बचा’ मोहीम ‘टॉप गीअर’वर आहे. अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) येथून सुरू झालेली ही मोहीम जगभरातील विविध शहरांमध्ये सुरू असून, सध्या जगामध्ये एकूण १४० मेयर्स आहेत. यामध्ये मुंबईचे नेतृत्व फिरोझा यांच्याकडे आहे. महत्त्वाचे म्हणजे १४० पैकी तब्बल ४१ मेयर्स एकट्या भारतात आहेत. त्यामुळे भारतात या मोहिमेने जबरदस्त जोर पकडल्याचे दिसत आहे.

प्रत्येक वॉर्डनुसार नियुक्त करण्यात आलेल्या काऊन्सिलर्सच्या वतीने दररोज आपल्या वॉर्डमध्येच एक छोटी राईड आयोजित केली जाते. तसेच, आठवड्यातील एक दिवस, २५ किमीहून अधिक अंतराची विशेष राईडही आयोजित होते. या राईडदरम्यान सर्वांना आपल्या वॉर्ड्सची, मुंबईची ऐतिहासिक, सांस्कृतिक माहितीही मिळते. त्यामुळेच ही मोहीम तंदुरुस्तीसोबतच, सामाजिक ज्ञान मिळविण्यासाठीही उपयुक्त ठरत आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, मात्र काही नियम नक्की आहेत. यामध्ये सुरक्षेला अधिक महत्त्व असून हेल्मेट नसेल, तर कोणालाही राईडमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे, मंडळी जर तुम्हाला या हटके मोहिमेत सहभागी व्हायचे असेल, तर केवळ सायकल असून चालणार नाही, तर हेल्मेटही घ्यावे लागेल! आणि हो... सोशल मीडियावर #cyclechalacitybacha सर्च करा, तुम्हाला तुमच्या विभागातील टीम लिडर्सची महिती लगेच मिळेल.

तेव्हा सायकलिंगची तयारी करा आणि व्हा सामील या अनोख्या मोहिमेमध्ये.. कारण या मोहिमेचे एक मोठे लक्ष्यही आहे, ते म्हणजे पुढील १० वर्षांत मुंबईला भारतातील ‘सायकलिंग राजधानी’ बनवायचे आहे आणि यासाठी या मोहिमेमध्ये तुमचा, आमचा सहभाग झालाच पाहिजे... हॅप्पी सायकलिंग!

Web Title: Bicycle, save the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.