Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंनी केलं आरेतील सिमेंट काँक्रीट कामाचे भूमिपूजन, ४७ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 22:36 IST

४७ कोटी रुपये खर्च करुन मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार

मुंबई : आरेतील अंतर्गत रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल तर येथील रुग्णालयही मुंबई महानगरपालिका अथवा शासनच्या ताब्यात देण्यात येईल, असे आश्‍वासन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेतील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीट कामाच्या भूमिपूजनावेळी दिले. आरेतील मुख्य रस्ता (दिनकर राव, देसाई मार्ग) सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार असून त्याचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल ४७ कोटी रुपये खर्चुन हा संपूर्ण ७.२ कि.मीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. 

२४ महिन्यांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी येथील कारशेड दुसर्‍या ठिकाणी हलविण्यासाठीचा अंतिम निर्णय लवकर घेण्यात येणार असल्याचे, आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आरेतील मुख्य रस्ता पूर्वी आरे प्रशासनाच्या अखत्यारीत येत होता. या मार्गावरुन प्रवास करण्यासाठी वाहनचालकांकडून टोल आकारण्यात येत येता. त्यामुळे या रस्त्यावरील टोल बंद करुन तो मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर येथील टोक बंद करुन हा ७.२ कि. मी चा मुख्य रस्ता (दिनकर देसाई मार्ग) मुंबई महापालिकेच्या ताब्यात दिल्याने वाहनचालकांनीही सुटकेचा निश्‍वास टाकला. त्यानंतर या रस्त्याचे डागडुजी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत होती. त्यामुळे हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा केल्यास येथील रस्ता कायमस्वरुपी चांगला बनेल, या उद्देशाने आमदार रविंद्र वायकर यांनी मंत्री आदित्य ठाकरे तसेच महापालिका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. 

भूमिपुजनाच्या कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधताना वायकर यांनी, आरे तलाव सुशोभिकरण, आरे गार्डन, आरे मुख्य प्रवेशद्वारासाठी निधी देण्यात यावा, तसेच आरेमधील हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधांनी पुन्हा सुरू करण्यासाठी हे रुग्णालय मनपा अथवा शासनाच्या ताब्यात देण्यात यावे, त्याचबरोबर आरेतील अंतर्गत रस्ते चांगले करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी विनंती यावेळी केली. त्यानुसार मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही दोन्ही कामे येत्या काही महिन्यात करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. तर आरे तलावाच्या सुशोभिकरणासाठी ही निधी आधीच देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

या रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी विभागप्रमुख व आमदार सुनिल प्रभू, जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर, नगसेविका रेखा रामवंशी, बाळा नर, प्रविण शिंदे, मुंबई महानगरपालिका सहाय्यक मनपा आयुक्त वेलारसु, उपायुक्त बालमवार, आरेच मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पवार, मनपाच्या रस्ते विभागाचे प्रमुख बोरसे, महिला विभाग प्रमुख साधना माने, विभागसंघटक विश्‍वनाथ सावंत, महिला विभाग संघटक शालिनी सावंत, रचना सावंत, विभाग समन्वयक भाई मिर्लेकर व बावा साळवी, शाखाप्रमुख संदिप गाढवे व बाळा तावडे, शाखासंघटक अपर्णा परळकर, अंकित प्रभू, शिवेसना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनामुंबई