ठाणे मेट्रोचे वर्षअखेरीस भूमिपूजन - मुख्यमंत्री
By Admin | Updated: September 6, 2015 01:02 IST2015-09-06T01:02:28+5:302015-09-06T01:02:28+5:30
मुंबईलगतच्या ठाण्याचा झपाट्याने विकास व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील असून या वर्षअखेरीस ठाणे मेट्रोचे भूमिपूजन होईल. मुंबई मेट्रोप्रमाणे हे काम रेंगाळून देता दिलेल्या

ठाणे मेट्रोचे वर्षअखेरीस भूमिपूजन - मुख्यमंत्री
ठाणे : मुंबईलगतच्या ठाण्याचा झपाट्याने विकास व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील असून या वर्षअखेरीस ठाणे मेट्रोचे भूमिपूजन होईल. मुंबई मेट्रोप्रमाणे हे काम रेंगाळून देता दिलेल्या वेळेतच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात दिली. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत व मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी ०.३३ एफ.एस.आय. देण्यास शासन अनुकूल असून इम्पॅक्ट अॅसेसमेंट तयार आहे. याबाबत, शासन निर्णय घेणार असलचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या २१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पुनरु ज्जीवित केलेल्या टाऊन हॉल व खुल्या प्रेक्षागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. इमारतींचा पुनर्विकास हा प्रकल्प राज्यातील इतर शहरांसाठीदेखील पथदर्शी म्हणून राबवल्याने सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे-मुंबई ही शहरे सांस्कृतिक कार्यक्रमांत अग्रेसर असतात. आपल्या संस्कृतीत दहीहंडीला जसे विशेष महत्त्व आहे तसेच सामाजिक व सांस्कृतिक अभिसरणात या उत्सवांना अधिक महत्त्व असून ते पारंपरिक पद्धतीने,कायद्याच्या चौकटीत बसवून साजरे करण्यास कुणीही अडवले नसल्याचे सांगून ते साजरे करू नका, अशा धमक्या जर कुणी देत असेल तरत्यांच्यावर पोलीस योग्य ती कार्यवाही करतील, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.
या वेळी चित्र प्रदर्शनाची पाहणी करून खुल्या प्रेक्षागृहाच्या कोनशिलेचे अनावरणही त्यांनी केले. हा टाऊन हॉल त्याकाळी शासनास दान केलेल्या कावसजी दिवेचा यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांनादेखील मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले. एक समृद्ध वारसा या लघुपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
क्लस्टर योजनेसाठी पावले उचलावीत
ठाण्यासाठी क्लस्टरची योजना प्राधान्याने राबवण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलावीत. तसेच यात मोडकळीस आलेल्या अनधिकृत इमारतींबरोबरच अधिकृत इमारतींचा समावेश करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच मेंटल हॉस्पिटलच्या जागेत विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकासाठी १० एकर जागा दिल्यास ठाण्यातील गर्दीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
या कार्यक्रमास महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मंदा म्हात्रे, संजय केळकर, सुभाष भोईर, नरेंद्र मेहता, जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त परमवीर सिंग उपस्थित होते.