Join us  

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण: मंदाकिनी खडसे सुट्टीच्या दिवशी ईडीच्या कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 8:05 AM

पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडे चौकशी न झाल्याने ईडीने त्यांच्या ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात होती.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला गैरहजर राहणाऱ्या   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे मंगळवारी ईडी कार्यालयात गेल्या. मात्र, शासकीय सुट्टीमुळे ते बंद असल्याने त्यांना बाहेरूनच माघारी जावे लागले. आता शुक्रवारी सकाळी दहा वाजता पुन्हा त्या कार्यालयात हजर राहणार आहेत.  पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडे चौकशी न झाल्याने ईडीने त्यांच्या ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, न्यायालयाने त्यांच्यावर  कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले. त्याऐवजी मंदाकिनी यांनी दर मंगळवार व सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीला हजर राहण्याची सूचना केली. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता त्या आपल्या वकिलासह कार्यालयाजवळ पोहोचल्या. ईडीने त्यांना पाठवलेल्या समन्सप्रमाणे त्या सकाळी १० वाजता ईडी कार्यालयात दाखल झाल्या, मात्र, त्यावेळी ईडी कार्यालय बंद होते. त्यामुळे   त्यांचे वकील मोहन टेकावडे  साडेदहा वाजेपर्यंत थाबून राहिले. मात्र, आज ईदनिमित्त सुट्टी असल्याने ते कार्यालय बंद असल्याचे स्पष्ट झाल्याने ते परत निघून गेले.यावेळी टेकावडे म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार १० वाजता आम्ही ईडी कार्यालयात आलो होतो. पण, आज सुट्टीबाबत काही सूचना नव्हती, त्यामुळे शुक्रवारी परत येणार आहोत.फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री पदी असताना खडसेंनी पुण्यातील भोसरीमधील ३.१ एकर जमीनीचा एमआयडीसीमधील प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ साली करण्यात आला. या जमीनीची किंमत ३१ कोटी रुपये इतकी असून ती केवळ ३ कोटी ७० लाखांना विकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :एकनाथ खडसेअंमलबजावणी संचालनालय