Join us  

मायानगरीचे रूप पालटणार; मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० कामांचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 8:44 AM

येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई : मुंबई शहराचा कायापालट करण्यासाठी आणि शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथे ५०० कामांचे एकाचवेळी भूमिपूजन करण्यात आले. 

मुंबई शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी केल्या जात आहेत. येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.मुंबईतील पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात, असा आमचा मानस आहे. त्या दिशेने आपण काम सुरू केले आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि रिसर्फेसिंग करून तसेच महत्त्वाचे रस्ते काँक्रिटचे करून किमान ३० वर्षे ते टिकतील, असे नियोजन केले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावर्षी जी-२० परिषद आयोजनाचा मान आपल्या देशाला मिळाला आहे. त्यानिमित्त मुंबईसह राज्यातील इतर शहरात १४ बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. यानिमित्त परदेशातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर मुंबई आणि आपल्या राज्याचे ब्रॅंडिग करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार ॲड. आशिष शेलार, मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि आशिष शर्मा उपस्थित होते.

चेहरामोहरा बदलणार उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई शहर सौंदर्यीकरण प्रकल्प अतिशय चांगला उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. मुंबई शहरात सर्व सुविधायुक्त आकांक्षित स्वच्छतागृहे बांधण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. सांडपाण्याच्या नियोजनासाठी कम्युनिटी वॉशिंग मशीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे, वीज नसलेल्या झोपडपट्टी परिसरात हँगिंग लाइट ही संकल्पना राबविण्याचे नियोजन सुरू आहे. ऐतिहासिक वारसास्थळांचे महत्त्व जाणून त्याच पद्धतीने त्याची जपणूक करण्यात येणार आहे. स्कायवॉकच्या ठिकाणी एस्केलेटर्स बसविण्यात येतील. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई