भिवंडी एस.टी.स्थानक ‘खड्ड्यात’
By Admin | Updated: March 4, 2015 23:20 IST2015-03-04T23:20:41+5:302015-03-04T23:20:41+5:30
स्थानिक एस.टी.बस स्थानकाच्या आवारात गेल्या काही महिन्यापासून खड्डे झाले असून नुकत्याच झालेल्या पावसाने त्यात पाणी साचल्याने प्रवाशांना बस पकडणे व चढणे कठीण झाले आहे़

भिवंडी एस.टी.स्थानक ‘खड्ड्यात’
भिवंडी : स्थानिक एस.टी.बस स्थानकाच्या आवारात गेल्या काही महिन्यापासून खड्डे झाले असून नुकत्याच झालेल्या पावसाने त्यात पाणी साचल्याने प्रवाशांना बस पकडणे व चढणे कठीण झाले आहे़
शहरांत प्रवासी वाहतूक सेवेसाठी एस.टी.बस ही एकमेव सेवा आहे. त्यामुळे ठाणे व कल्याण रेल्वेस्टेशन गाठण्यासाठी शहरवासी नेहमी या बस स्थानकांत मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात. तर ग्रामीण नागरिकांना एसटीशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे बस स्थानकास चांगले उत्पन्न असताना प्रवाशांच्या सेवा-सुविधेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. स्थानकाच्या आवारात व तेथील वर्कशॉपमध्ये मोठमोठे खड्डे झालेले आहेत. आवारातील रस्ता बनविताना पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराकडे उतरता झाला पाहिजे, तसेच त्यासाठी वापरलेले मटेरीयल योग्य आहे किंवा नाही, या कडे महामंडळाचे अधिकारी, अभियंता व बांधकाम ठेकेदार लक्ष देत नाही. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी पाणी साचून स्थानकांतील रस्ता नादुरूस्त होऊन खड्डे पडतात. (प्रतिनिधी)
शहरांतील बाहेर जाण्यासाठी दुसरे साधन नसल्याने भिवंडी बस स्थानकांतून जास्तीतजास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे आगार व्यवस्थापकाकडून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. त्यानुसार महामंडळाने केवळ बस स्थानकातील रस्ते दुरूस्तीसाठी २ लाख ५७ हजार रूपयांचे टेन्डर मागविले आहे. त्यामुळे हे रस्ते एक-दीड महिन्यात होतील.
- योगेश खोडे, आगार प्रमुख