वाचन संस्कृतीसाठी ‘पुस्तकांची भिशी’, दुर्गम भागात देणार पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 08:05 IST2017-12-31T08:05:48+5:302017-12-31T08:05:55+5:30
दिवसेंदिवस लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी ‘पुस्तकांची भिशी’ हा आगळावेगळा उपक्रम काही महाविद्यालयीन युवकांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागासह दुर्गम पाड्यांत राहणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना वाचनासाठी चांगल्या दर्जाची पुस्तके मोफत पुरवण्यात येणार आहेत.

वाचन संस्कृतीसाठी ‘पुस्तकांची भिशी’, दुर्गम भागात देणार पुस्तके
- सागर नेवरेकर
मुंबई : दिवसेंदिवस लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी ‘पुस्तकांची भिशी’ हा आगळावेगळा उपक्रम काही महाविद्यालयीन युवकांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागासह दुर्गम पाड्यांत राहणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना वाचनासाठी चांगल्या दर्जाची पुस्तके मोफत पुरवण्यात येणार आहेत.
दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके उपलब्ध व्हावीत, त्यांच्यातील कल्पनाशक्ती आणि विचारक्षमतेची वृद्धी व्हावी याकरिता हा उपक्रम नवीन वर्षात सुरू करण्यात येणार आहे. दर महिन्याला पैशांच्या भिशीमध्ये जसे आपण ठरावीक पैसे गुंतवतो, त्याचप्रमाणे या भिशीत
दर महिन्याला या युवकांनी किमान
एक पुस्तक जमा करण्याचे ठरवले आहे.
सुरुवातीला अक्षय वणे, सिद्धेश सूर्यवंशी या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम आता लोकचळवळ होत आहे. या उपक्रमात पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांत पुस्तकांचे वितरण करण्यासाठी सेवा सहयोग ही संस्था मदत करणार आहे. तर काही पुस्तके मुंबईतील झोपडपट्टी वस्तीत चालविल्या जाणाºया अभ्यासिकांमधील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.
हा उपक्रम केवळ वाचनापुरता मर्यादित न ठेवता पुस्तकांच्या भिशीच्या माध्यमातून वाचन, कथाकथन, कथालेखन अशा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यात पाया मजबूत करण्यासाठी सर्व माध्यमांतील पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतच्या पुस्तकांचा समावेश केला जाणार आहे. तसेच कथा, गोष्टी, ऐतिहासिक, पौराणिक, माहितीपर, विज्ञानकथा, साहसकथा, चरित्रात्मक, कविता, गीते, बडबडगीते आणि चित्रकला अशा नानाविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेशही या उपक्रमात होणार आहे.
अशी चालणार भिशी!
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रंथालयात ही पुस्तके ठेवली जातील.
आत्तापर्यंत सुमारे २०० पुस्तकांची नोंद या उपक्रमात झाली आहे.
दोन युवकांनी सुरू केलेल्या या भिशीमध्ये आता तब्बल ४० सभासद जोडले गेले आहेत.
मुंबईसह ठाणे विभागातून मोठ्या संख्येने सोशल मीडियातून हे सभासद एकत्र आले आहेत.
सोशल मीडियामार्फत या भिशीमध्ये कोणत्याही वाचनप्रेमीला सामील होता येईल.