भार्इंदर अग्निशमन दलाला मिळणार ६२ मीटर उंचीची शिडी
By Admin | Updated: June 15, 2015 23:26 IST2015-06-15T23:26:02+5:302015-06-15T23:26:02+5:30
झपाट्याने विकसित होत असलेल्या मीरा-भार्इंदर शहरातील जास्त उंचीच्या इमारतींमधील आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची यंत्रणा

भार्इंदर अग्निशमन दलाला मिळणार ६२ मीटर उंचीची शिडी
भार्इंदर : झपाट्याने विकसित होत असलेल्या मीरा-भार्इंदर शहरातील जास्त उंचीच्या इमारतींमधील आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची यंत्रणा तेथपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पालिकेकडून ६२ मीटर उंचीची टीटीएल (टेबल टर्न लॅडर) अर्थात शिडी खरेदी करण्याचा प्रस्ताव येत्या १७ जूनच्या महासभेत आणण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास अग्निशमन दल काहीसे अद्ययावत होणार आहे.
सुमारे १२ लाखांवर लोकसंख्या व ६ हजारांहून अधिक इमारती असलेल्या शहरात अग्निशमन दलाची एकूण तीनच केंद्रे सुरू आहेत. त्यात भार्इंदर पश्चिमेकडील ६० फुटी मार्ग, उत्तन व मीरा रोड येथील सिल्व्हर पार्क केंद्राचा समावेश असून शहरीकरणाच्या तुलनेत आणखी केंद्रांची निर्मिती आवश्यक आहे. त्यात भार्इंदर पश्चिमेच्या उड्डाणपुलाजवळ नव्याने बांधण्यात आलेले एक मजली अग्निशमन केंद्र दीड वर्षापासून धूळखात पडले आहे, तर नवघर येथील एका शेडमधील केंद्रात सुविधांची वानवा आहे. या केंद्रात आपत्कालीन सेवेकरिता प्रत्येकी ६ वॉटर व फायर टेंडर आहेत. दोन मिनीफायर टेंडरसह १ रेस्क्यू व्हॅन व ४ पाण्याचे टँकर आहेत. तीन वर्षांपूर्वी आॅस्ट्रिया बनावटीचे सुमारे ७ कोटींचे ३९ मीटर उंचीचे टीटीएल वाहन खरेदी करण्यात आले आहे. पालिकेकडून सध्या ७० मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी देण्यात येत आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या इमारतींमध्ये आगीसारख्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निरोधक यंत्रणा बसविणे आहे.
पालिकेने मात्र यावर उतारा शोधला असून ६२ मी. उंचीपर्यंत पोहोचणारे नवीन टीटीएल वाहन खरेदी करून अग्निशमन दल अद्ययावत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात नवीन फायर फायटर खरेदी लेखाशीर्षकांतर्गत १२ कोटींची तरतूद केली आहे. (प्रतिनिधी)