ठाणे जिल्ह्यात भीम भक्तांचा जल्लोष
By Admin | Updated: April 14, 2015 23:17 IST2015-04-14T23:17:51+5:302015-04-14T23:17:51+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी आज देशभरातून दादरच्या चैत्यभूमिकडे आलेल्या लाखो भीम भक्तांनी ठाण्यातील निळ्या जल्लोषात उस्फूर्त सहभाग दिला.

ठाणे जिल्ह्यात भीम भक्तांचा जल्लोष
ठाणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी आज देशभरातून दादरच्या चैत्यभूमिकडे आलेल्या लाखो भीम भक्तांनी ठाण्यातील निळ्या जल्लोषात उस्फूर्त सहभाग दिला. याच बरोबर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मिळेल त्या गाडीने मुंबईकडे निघणारे भिमभक्त ‘जय भीम’चे नारे देत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पुतळ्याचे दर्शन घेत होते. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर या शहरांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासकीय कार्यालयांमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तर राजकीय पक्ष, संस्थांच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणूकांमुळे जिल्हयात निळा जल्लोष पाहायला मिळाला.
महापालिका भवन येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला महापौर संजय मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर टेंभी नाका येथील पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक स्टेशन रोड येथील पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आली. मिरवणूकीला सुरूवात झाली. या मिरवणूकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे,उपमहापौर राजेंद्र साप्ते,सभागृह नेते नरेश म्हस्के सहभागी झाले होते. त्यांनीही पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर इंदिरा नगर, आनंद नगर,यशोधन नगर,कळवा परिसरातही मिरवणूका निघाल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप बोरसे, सहाय्यक आयुक्त उज्जवला सपकाळे , ए.बी.तोरसकर,पी.एस.कांबळे आणि कर्मचारी उपस्थित होते.
कल्याणमध्ये जयंती साजरी
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केडीएमसी मुख्यालयात आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर कल्याणी पाटील, आयुक्त मधुकर अर्दड, उपायुक्त सुनील लहाने, सुरेश पवार, सचिव सुभाष भुजबळ यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. रेल्वेस्थानक परिसरातील आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळयालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी महापौर रमेश जाधव आणि नगरसेविका रेखा जाधव हे देखील उपस्थित होते. रिक्षा चालक मालक असोसिएशनच्या वतीने सुभाष चौकात कार्यक्रम होते.
उल्हासनगरात आंबेडकरी जलसा
शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समाजसेवी मंडळ, पुतळा स्मारक समिती, रिपाईने आंबेडकर फेस्टीवल, भीमउत्सव, आंबेडकरी जलसा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले.