- मनोहर कुंभेजकरमुंबई - देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय काल केंद्र सरकारने जाहिर केला.देशभरातील दलित, मागासवर्गीय आणि वंचित समाजासासाठी ऐतिहासिक आहे. जातीय जनगणनेचा निर्णय करा ही मागणी अनेक दशकांपासूनची होती. पण हा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदू बनवण्याचे श्रेय पूर्णपणे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना जाते असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य भावना जैन यांनी स्पष्ट केले.
जातीय जनगणनेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,मात्र ही जनगणना कधी पूर्ण होणार,त्याला किती कालावधी लागणार हे केंद्र सरकारने स्पष्ट करण्याची त्यांनी मागणी केली. आज त्यांची अंधेरी (पश्चिम) डी. एन.नगर जवळील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
राहुल गांधी यांनी प्रत्येक व्यासपीठावर, प्रत्येक संसद अधिवेशनात आणि भारत जोडो यात्रेसारख्या जनआंदोलनांमध्ये वारंवार स्पष्ट केले आहे की जोपर्यंत देशात जनगणना होत नाही तोपर्यंत नागरिकांचे अधिकार अपूर्ण राहतील.त्यांच्या अढळ नेतृत्वाशिवाय, धाडस आणि दृढनिश्चयाशिवाय हे शक्य झाले नसते. जिथे जिथे विरोध झाला तिथे त्यांनी आवाज उठवला. जेव्हा सरकार गप्प होते तेव्हा ते रस्त्यावर होते. त्यांनी हा मुद्दा केवळ राजकीयच नाही तर मानवी आणि संवैधानिक हक्कांचा प्रश्न देखील बनवल्याचे भावना जैन म्हणाल्या.
आज हा निर्णय कोट्यवधी वंचितांचा आवाज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांच्या दिशेने हे एक मजबूत पाऊल आहे आणि सामाजिक न्यायाप्रती राहुल गांधींची वचनबद्धता सिद्ध करते असे त्यांनी सांगितले.