भातजमिनी नापीक होण्याची भीती

By Admin | Updated: December 29, 2014 22:43 IST2014-12-29T22:43:34+5:302014-12-29T22:43:34+5:30

भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील भातशेती कोणत्या ना कोणत्या कारणाने सध्या नापीक होताना दिसत आहे.

Bhatminsini fear of becoming infertile | भातजमिनी नापीक होण्याची भीती

भातजमिनी नापीक होण्याची भीती

दासगाव : भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील भातशेती कोणत्या ना कोणत्या कारणाने सध्या नापीक होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात जमिनींची विक्री आणि भात शेती परवडू न लागल्याने झालेले स्थलांतर यामुळे भातजमिनींकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि या जमिनींवर कशेल जातीच्या गवताने अतिक्रमण केले आहे. परिणामी महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील जवळपास हजारो एकर शेती नापीक झाली आहे.
महाड तालुक्यात विशेषत: खाडीपट्टा भागात हजारो एकर शेतजमिनींवर हे गवत वाढले आहे. माणसापेक्षा उंच असलेले हे गवत उन्हाळ्यातही तग धरून ठेवते आणि ऐन पावसाळयात पुन्हा उभारी घेते. या गवताला ग्रामीण भागात कशेल म्हटले जाते. याची बी वाऱ्याबरोबर इतर जमिनींवर जावून पडते आणि पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाढत असल्याने शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे. खाडीपट्टा भागातील दादलीपासून थेट वराठी गाव आणि दासगावपासून दाभोळपर्यंत या गवताचा प्रादुर्भाव दिसून येतो. सव, गोठे, कुंबळे, रावढळ, तुडील, जुई, चिंभावे आदि गावातील घरांशेजारील मोकळी जागा, नाले आणि गटारांजवळ, शेताचे बांध आदी ठिकाणी या गवताने आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
महाडमधील खाडीपट्टा हा विभाग एकेकाळी भाताबरोबर कडधान्ये पीक घेण्यात अग्रेसर होता. मात्र आता या भागातील भातशेती आणि खाडी मोठ्याप्रमाणात प्रदूषित झाली.
खाडीचे पाणी भरतीच्या पाण्याबरोबर भातशेतात येवू लागले आणि प्रदूषणात भरच पडली. नोकरीच्या शोधात तरूणांचा ओढा मुंबई, पुणेसारख्या शहरांकडे वाढला आणि गावातील घरे ओस पडली. मजुरांची कमतरता आणि वाढती महागाई पाहता घरातील वृध्द माणसे जमेल तेवढी शेती करू लागले आणि बाकीची भातजमीन पडीक राहू लागली.
नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे शिक्षण या निमित्ताने तरूण गाव सोडून महाडमध्ये गेल्याने गावांतील जमिनी ओस पडल्या आणि कशेल गवताने शेतीवर ताबा मिळवल्याचे वृध्द शेतकरी सांगतात.
ज्या जुई गावात २००५ मध्ये दरड कोसळली त्याठिकाणी देखील हीच स्थिती आहे. ज्यांची जिवाभावाची माणसे जमिनीत गाडली गेली त्यांची जमीन देखील अशाच प्रकारे कशेल गवताने व्यापली आहे.
गावातील वयोवृध्द सांगतात, नोकरी व्यवसायासाठी गावातील तरुण शहरात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे सोन्यासारखी शेती ओस पडली आहे. आपली तीन एकर शेती या कशेलने बाद झाल्याचे येथील वृध्द सांगतात. (वार्ताहर)

कडधान्यांवर देखील अमरवेलीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता, त्यापाठोपाठ आता कशेलची डोकेदुखी वाढली आहे. कृषी विभागाने या गवतावर ठोस उपाय केल्यास हजारो एकर भातजमीन पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल. ही स्थिती केवळ खाडीपट्ट्यातच दिसून येते असे नाही तर महाडजवळील बिरवाडी, कोल, कोथेरी, नोते आदि विभागात देखील या गवताचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

कशेल हे गवत काढून नांगरणी केली तर त्याचा शेतीसाठी उपयोग करता येणे शक्य आहे किंवा गवत काढून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रब्बी पिके घेण्यास सुरूवात केली तर या गवताचा प्रादुर्भाव कमी होईल. मात्र त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे.
- पी.बी.नवले,
कृषी अधिकारी, महाड.

Web Title: Bhatminsini fear of becoming infertile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.