भार्इंदरला अतिरिक्त १०० द.ल पाणी
By Admin | Updated: December 17, 2014 23:12 IST2014-12-17T23:12:46+5:302014-12-17T23:12:46+5:30
झपाट्याने विकसित होणाऱ्या मीरा-भार्इंदर शहरातील पाणी पुरवठा अपुरा असल्याने शहराला १०० दशलक्ष अतिरीक्त पाणीपुरवठा

भार्इंदरला अतिरिक्त १०० द.ल पाणी
भाईंदर : झपाट्याने विकसित होणाऱ्या मीरा-भार्इंदर शहरातील पाणी पुरवठा अपुरा असल्याने शहराला १०० दशलक्ष अतिरीक्त पाणीपुरवठा करण्याच्या आ. प्रताप सरनाईकांच्या मागणीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बोलविलेल्या तातडीच्या बैठकीत भाईंदरला हे पाणी लवकरात लवकर देण्याचे निर्देश एमआयडीसीला दिले आहेत. यामुळे शहरातील पाण्याची समस्या बहुतांशी मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शहरात स्वतंत्र पाण्याचा स्त्रोत नसल्याने भाईंदरला केवळ शासकीय कोट्यावरच तहान भागवावी लागत आहे. शहराला सध्या स्टेम कंपनीकडून ८६ व एमआयडीसीकडुन ५० दशलक्ष लीटर पाणी मिळत आहे. सुमारे १३ लाखांच्या आसपास गेलेल्या लोकसंख्येला हा पाणीपुरवठा अपुरा असून त्यात आणखी ७५ दशलक्ष पाणी पुरवठा एमआयडीसीकडुन मंजूर करण्यात आल्याने तो तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतरच शहराला मिळणार आहे. त्यातच शहरात लोकवस्तींची वाढ झपाट्याने होत असताना शासकीय गृहसंकुलांच्या योजनांचीही त्यात नव्याने भर पडत आहे. त्यामुळे उपलब्ध अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या कायम राहणार आहे. ही समस्या मार्गी लागावी, या उद्देशाने सरनाईक यांनी शहराला एमआयडीसी कोट्यातून अतिरीक्त १०० दशलक्ष पाणी मिळण्याची मागणी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. त्याची दखल घेत उद्योगमंत्र्यांनी नागपूर येथे एमआयडीसी व पालिका अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीची बैठक बोलवली होती. त्यात उद्योगमंत्र्यांनी शहराला आणखी १०० दशलक्ष पाणी देण्याची सूचना एमआयडीसीच्या वरीष्ठ आधिका-यांना केली. त्यावर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांनी अलिकडेच शहराला २५ दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणी मंजूर केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)