Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 12:20 IST

१९ ऑक्टोबर १९२७ रोजी जन्मलेल्या अरविंद पारिख यांनी वयाच्या १७ व्या वर्षी उस्ताद विलायत खान यांच्याकडे सतारीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

मुंबई -  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन २०१९ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली. 

१९ ऑक्टोबर १९२७ रोजी जन्मलेल्या अरविंद पारिख यांनी वयाच्या १७ व्या वर्षी उस्ताद विलायत खान यांच्याकडे सतारीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर पुढची साठ वर्षे, उस्तादजींच्या अखेरपर्यंत  त्यांचे हे शिक्षण अव्याहतपणे सुरु होते. या काळात त्यांनी इतर अनेक महान गायक-वादकांच्या शैलीचाही जवळून अभ्यास केला. त्यातील अनेक बारकावे त्यांच्या वादनात दिसून आले. पं. पारिख आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून  त्यांनी देश-विदेशात सतार वादनाचे असंख्य कार्यक्रम केले. सितार गुरु व बंदिश परंपरा या ग्रंथांमध्ये बांधलेल्या त्यांनी बंदिशींचा समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोच्या संगीतविषयक समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांनी तीन वर्षै काम पाहिले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभले असून जगभरात त्यांचे शिष्य त्यांचे संगीत प्रसाराचे कार्य पुढे नेत आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अरविंद पारिख यांचे पुरस्काराबददल अभिनंदन केले आहे. 

शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला सन २०१२-१३ पासून भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. श्रीमती किशोरी आमोणकर, पं. जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं. राम नारायण, श्रीमती परविन सुलताना, श्रीमती माणिक भिडे, पं केशव गिंडे, यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

टॅग्स :भीमसेन जोशीराज्य सरकार