Join us  

Bharat Bandh : मुंबईतील शाळा, महाविद्यालये सुरूच राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 9:20 AM

Bharat Bandh : डिझेल व पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, काँग्रेसने भारत बंद आंदोलन पुकारले असले तरी सुद्धा मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये सुरुच राहणार आहेत. 

मुंबई : डिझेल व पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, काँग्रेसने भारत बंद आंदोलन पुकारले असले तरी सुद्धा मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये सुरुच राहणार आहेत. 

मुंबईतील या बंद आंदोलनाला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरात सर्व काही बंद राहील या भीतीने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक संघटनेनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी शाळा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, शाळांचे मुख्याध्यापक परिस्थितीचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात पाऊस आणि इतर कारणांमुळे आठ दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आवश्यक शैक्षणिक दिवस व तास पूर्ण होणे शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर आता अनेक शाळा शनिवारच्या दिवशी अर्धवेळऐवजी पूर्णवेळ शाळा ठेवून शैक्षणिक तास भरून काढत आहेत, असेही रेडीज म्हणाले. 

(Bharat Bandh Live Updates: 'भारत बंद'ला सुरुवात; देशभरात काँग्रेसची निदर्शनं)

मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडणार या बंदच्या माध्यमातून, आधी चार राज्यांत विधानसभेच्या व नंतर लोकसभेची निवडणूक होणार असताना, मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. ''देशात इंधनाचे भाव दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे, अशा वेळी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. सोमवारचा ‘भारत बंद’ त्यासाठीच आहे. देशभरातील व्यापारी वर्गाने त्याला उत्स्फूर्तपणे साथ द्यावी, असे आवाहन करीत माकन म्हणाले, बंदच्या काळात कोणत्याही प्रकारची हिंसक घटना होणार नाही, बंद शांततेत पार पडेल, याची आम्ही दक्षता घेतली आहे'', असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. 

‘बंद’ची कारणमीमांसा देताना माकन म्हणाले, चार वर्षांत पेट्रोलवर २११.७ टक्के व डिझेलवर ४४३ टक्के एक्साईज ड्युटी वाढली आहे. मे २0१४ मधे पेट्रोलवर ९.२ रूपये व डिझेलवर ३.४६ रूपये एक्साईज कर होता आता तो अनुक्रमे १९.४८ रूपये व १५.३३ रूपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. सरकारने गेल्या चार वर्षात इंधनावरील एक्साईज ड्युटीव्दारे ११ लाख कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे इंधन भडक्याने वाढत चाललेली तमाम वस्तूंची महागाई रोखण्यासाठी पेट्रोल व डिझेलला त्वरित ‘जीएसटी’च्या कक्षेत आणावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.

(Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे)

जनतेला उत्तर हवे आहे....डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या सुरू असलेल्या घसरणीचा उल्लेख करीत माकन म्हणाले, युपीएच्या काळात डॉलरच्या तुलनेत रूपया ६0 वर पोहोचला तेव्हा नरेंद्र मोदी म्हणायचे की, रूपया अति दक्षता विभागात दाखल झाला आहे आता रूपयाने ७२ ची सीमा पार केली तेव्हा पंतप्रधान मोदींना काय म्हणायचे आहे? डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत करण्यासाठी सरकारने काय केले, त्याचे उत्तरही जनतेला हवे आहे.राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते राज्यातील विविध आंदोलनात सहभागी होतील. शांततामय मार्गा$ने बंद यशस्वी करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :भारत बंदशाळा