भापोसे-मपोसे वाद चव्हाट्यावर
By Admin | Updated: November 9, 2016 04:23 IST2016-11-09T04:23:30+5:302016-11-09T04:23:30+5:30
अमरावती परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी आत्महत्या करण्याच्या दिलेल्या कथित धमकीमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून यानिमित्ताने भापोसे-मपोसे वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे

भापोसे-मपोसे वाद चव्हाट्यावर
जमीर काझी, मुंबई
अमरावती परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी आत्महत्या करण्याच्या दिलेल्या कथित धमकीमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून यानिमित्ताने भापोसे-मपोसे वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या आधीही ‘मपोसे’ असल्यामुळे वरिष्ठांकडून झालेल्या मानसिक छळाची प्रकरणे घडली आहेत. सुमारे ११ वर्षाच्या दीर्घ निलंबनानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा सेवेत आलेले मपोसे उपायुक्त एस.एस.साबळे हे धुळे राज्य राखीव दलाच्या समादेशकपदाची धुरा सांभाळूनही निवृत्त होईपर्यत त्यांना वेतन देण्यात येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सपत्नीक आत्महत्या करणार असल्याचे पत्र तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठविले होते. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या थकीत वेतनाची पूर्तता केली.
३१ आॅक्टोबरला निवृत्त झालेले सुनील पारस्कर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतरही त्यांचे प्रमोशन निवृत्तीला जेमतेम पंधरवड्याचा अवधी असताना करण्यात आले. अशाच पद्धतीने केल्या जाणाऱ्या अन्यायामुळे पोलीस उपायुक्त शशिकांत शिंदे यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्याविरुद्ध ‘अॅट्रोसिटी’चा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
त्याशिवाय उपअधीक्षक म्हणून भरती होऊन अप्पर महासंचालक दर्जापर्यत पोहोचलेले आर. आर. माणगावकर, सूर्यप्रताप गुप्ता, आयजी सईद यांना निवृत्तीपर्यत साइड पोस्टिंग देण्यात आल्या. त्याउलट त्यांच्याहून अधिक गंभीर तक्रारी व त्यासंबंधी तपास झालेल्या काही आयपीएस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पोस्टिंग दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या या लॉबीला राज्यकर्ते व नेत्यांनी आपल्या सोयीसाठी वेळोवेळी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे खतपाणी घातले आहे. त्यामुळे वरकरणी एक असलेल्या पोलीस दलातील हा वाद कित्येक वर्षांपासून कायम आहे.