सात धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले
By Admin | Updated: September 9, 2015 00:03 IST2015-09-09T00:03:38+5:302015-09-09T00:03:38+5:30
न्यायालयाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांवर रात्रीच्या वेळेस भोंगे वाजवण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करत असतानाच सात

सात धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले
नवी मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांवर रात्रीच्या वेळेस भोंगे वाजवण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करत असतानाच सात अनधिकृत धार्मिक स्थळांवरील भोंगे पोलिसांनी काढले. त्यामध्ये पाच मशिदी व दोन मंदिरांचा समावेश आहे.
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ध्वनिक्षेपक वाजवण्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. परंतु हा निर्णय अमलात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेवून त्यात यशही मिळवले आहे. राज्यात प्रथमच नवी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत अनेक धार्मिक संघटनांनी पोलिसांना सहकार्याची भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी प्रक्रिया राबवत असताना परिमंडळ १ मधील धार्मिक स्थळांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सात अनधिकृत धार्मिक स्थळांवर भोंग्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या सातही अनधिकृत धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. ज्या अधिकृत धार्मिक स्थळांवर स्पीकर वापराची परवानगी प्रक्रियेत होती अशा अधिकृत धार्मिक स्थळांना वेळेचे बंधन घालत ध्वनिक्षेपक वापराला परवानगी दिल्याचेही उमाप यांनी सांगितले.