Join us

भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

By मनीषा म्हात्रे | Updated: June 28, 2025 12:57 IST

Mumbai Crime News Latest: सोमवार ते मंगळवार दरम्यान कोकरे दाम्पत्याने मुलाला माचीसच्या काडीचे चटके दिले. वेताची काठी तुटेपर्यंत त्याला मारहाण केली. दोन्ही पायात पकडून त्याचे केस उपटले.

- मनीषा म्हात्रे, मुंबई अडीच वर्षाच्या चिमुकल्याला भुताटकी उतरवण्याच्या नावाखाली चटके देत वेताच्या छडीने मारहाण करणाऱ्या दाम्पत्याने अटकेनंतर पोलीस ठाण्यातही मंत्रोच्चार सुरु केला होता. मात्र, भांडुप पोलिसांनी त्यांचे भूत उतरवत त्यांना फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दाम्पत्याची अनाथ मुलांसाठी संस्था उघडण्याच्या दृष्टीने हालचाल सुरु असल्याचेही तपासात समोर आले. त्यांच्या घरातून जादूटोणा संबंधित ७ पुस्तके तसेच साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामागे आणखीन काही जण असण्याच्या शक्यतेतूनही तपास सुरु आहे.

भांडुपच्या जंगल मंगल रोड येथील एका इमारतीत राहणारे विकृत  वैभव कोकरे आणि हर्षदा गुरव - कोकरे हे दाम्पत्य १४ वर्षांपासून लिव्हिंग रिलेशनमध्ये राहिल्यानंतर गेल्या आठवड्यातच दोघांनी  लग्न केले होते. 

हर्षदा ही यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी पद्धतीने शिपाई म्हणून काम करायची. दीड दिवस कोकरे दाम्पत्याच्या मारहाणीत मुलाची अवस्था बघून तक्रारदार गार्गी कदमने मुलासोबत पळू काढला. त्यानंतर कोकरे दाम्पत्यानेही घराला टाळे ठोकून लपण्यास सुरुवात केली. 

प्रकरण बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पोलीस ठाण्यात येताच सहाय्यक पोलीस आयुक्त जितेंद्र आगरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक महेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला. 

एपीआय अविनाश नडवीनकेरी यांनी आरोपींचे घर गाठले. घराला टाळे होते.  त्यांनी आरोपींचे लोकेशन काढले ते घणसोली निघाले. अशावेळी आरोपींना कुठलाही सुगावा न लागता त्यांच्या पर्यंत पोहचण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते.

एपीआय अविनाश यांनी राहत्या इमारतीत चौकशी सुरु करताच त्यांना आरोपीची रिक्षा आणि दुचाकी तेथे पार्क असल्याचे समजले. त्यांनी तोच धागा पकडून कोकरेला कॉल केला. "सोसायटीच्या तक्रारीनंतर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत वाहने जप्त केली आहे. कागदपत्रे घेऊन तात्काळ येण्यास सांगताच" कोकरेने तेथे धाव घेतली." पथकाने अवघ्या काही तासांतच दोघांना ताब्यात घेत बेडया ठोकल्या.  

घरातून ७ जादूटोणा संबंधित पुस्तके, नारळ तसेच अघोरी प्रकारांसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दोघांनाही ही विद्या कोणी शिकवली? यामागे आणखीन किती जणांचा सहभाग आहे? आणखीन कुणावर अशा पद्धतीने जादूटोणा कारण्यात आला होता का? याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोघांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनी पोलीस ठाण्यातही मंत्रोच्चार सुरु केले होते. तसेच दोघांच्या अंगात देवाचे वारे येत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी दोघांची भुताटकी उतरली असून त्यांच्याकडे तपास सुरु आहे. वेळीच पळ काढल्यामुळे बाळ वाचले...

पती अंथरुणाला खिळल्याने मुलाला सोबत घेऊनच तक्रारदार गार्गी कदम कोकरेच्या घरी घरकामासाठी जात होती. मुलगा अनेकदा रडायचा. वैभव कोकरे कामासाठी बाहेर पडताच त्याच्यामागे मामा म्हणत धावायचा. 

यातून मुलाच्या अंगात भूत असून ते मागे लागत असल्याचे हर्षदाने सांगितले. "आम्ही भूत उतरवतो" म्हणत कोकरे दाम्पत्याने गार्गीला काही दिवस घरी राहण्यासाठी बोलावले. तिनेही विश्वास ठेवून रविवारपासून कोकरे यांचे घरी राहण्यास आली. 

सोमवार ते मंगळवार दरम्यान कोकरे दाम्पत्याने मुलाला माचीसच्या काडीचे चटके दिले. वेताची काठी तुटेपर्यंत त्याला मारहाण केली. दोन्ही पायात पकडून त्याचे केस उपटले. हर्षदा त्याच्या अंगावर बसूनही केस उपटून मारायची असेही वैभवने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले. 

दीड दिवसाने मुलाच्या अंगावरील जखमा बघून आईने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला. अखेर, बुधवारी महिलेने संधी साधून बाहेर पळ काढला. घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगून पोलीस ठाणे गाठले. 

वेळीच तेथून बाहेर पडल्यामुळे बाळ वाचले, अन्यथा आरोपींच्या बेदम मारहाणीत मुलाच्या जीवावर बेतले असते अशीही शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई पोलीसपती- जोडीदार