Join us  

भांडुप प्रकल्प झाला ४४ वर्षांचा, नव्या वर्षात नवा प्रकल्प; ३५० कोटी रुपयांची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:09 AM

९० दशलक्ष लिटरनी प्रकल्पाची क्षमता वाढणार.

मुंबई : भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प १९७९ साली बांधण्यात आले हाेते. त्याचे आयुष्य  अवघे चार ते पाच वर्ष शिल्लक आहे. महानगरपालिकेने आता नवीन प्रकल्प बांधणीचे काम हाती घेतले आहे. साधारणपणे अशा प्रकल्पांचे आयुर्मान ५० ते ५२ वर्षे असते. या प्रकल्पाची बांधणी १९७९ साली करण्यात आली आहे.

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र, दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला होत असल्याचा दावा पालिका जल विभागाकडून करण्यात येतो. मात्र, पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २५ ते ३० टक्के म्हणजेच साडेआठशे ते ९०० दशलक्ष लिटर पाणीचोरी व गळतीमुळे वाया जाते. त्यामुळे प्रत्यक्षात मुंबईची तहान भागवण्यासाठी फक्त २, ९०० दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होत असतो. यातील भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पात १९१० दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते.

४ वर्षांचा कालावधी लागणार :

जलशुद्धीकरण हा पाणी वितरण साखळीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याने पालिकेने भांडुप संकुल अधिकाधिक अद्ययावत करण्याचे निश्चित केले आहे. कोणत्याही कारणाने एखादा प्लांट बंद पडला किंवा दुरुस्तीची गरज भासली, तर पर्यायी व्यवस्था असावी, यासाठी नवीन प्लांटची आवश्यकता असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नव्याने बांधण्यात येणाऱ्या भांडुपमधील या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी १४६० दिवस म्हणजेच ४ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शिवाय ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलशुद्धीकरण (प्रकल्प) विभागाने दिली आहे. दरम्यान नवीन प्रकल्प उभारताना जुना प्रकल्प सुरू ठेवण्यात येणार आहे.

दोन हजार दशलक्ष क्षमतेचा नवा प्रकल्प :

भांडुपमधील या जलशुद्धीकरण प्रकल्पाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाची संरचना कुमकुवत झाली असून, त्याचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता येथे २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय जल अभियंता अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे.नव्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती या विभागाने दिली. हा नवीन प्रकल्प उभारेपर्यंत जुना असलेला १९१० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईभांडुप पश्चिमपाणी