Join us  

शिक्षण धोरणाच्या टास्क फोर्समधून भालचंद्र मुणगेकर यांची माघार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 2:52 AM

केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाची घोषणा केल्यानंतर, त्याच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आॅगस्टमध्ये केली होती.

मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणीबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तयार केलेल्या टास्क फोर्समधून माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी माघार घेतली. टास्क फोर्सची निर्मिती करताना सरकारी पातळीवर पाळावयाच्या शिष्टाचारांचे पालन झाले नसल्याने मुणगेकर त्यांनी माघार घेतल्याचे समजते.

केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाची घोषणा केल्यानंतर, त्याच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आॅगस्टमध्ये केली होती. त्यानुसार, तंत्रशिक्षण विभागाने एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू वसुधा कामत यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना केली. यात मुणगेकर यांचाही समावेश होता. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, नियोजन आयोगाचे माजी सदस्य, राज्यसभेचे माजी सदस्य आणि भारतीय उच्च अध्ययन संस्थेचे (सहा वर्षे) माजी अध्यक्ष म्हणून काम केल्यामुळे सार्वजनिक, राजकीय, सरकारी पातळीवर जे संकेत पाळायचे असतात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. टास्क फोर्स स्थापनेवेळी या संकेतांचे पालन झाले नाही. त्यामुळे समितीवर सदस्य म्हणून काम करणे शक्य नाही. मात्र, गेली चार दशके शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याने समितीला विचारविनिमय करावासा वाटल्यास, कायम उपलब्ध असेन, असे मुणगेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना सांगितल्याचे समजते.

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्र