पंचायत समित्यांवर भगव्याचे वर्चस्व
By Admin | Updated: February 16, 2015 23:14 IST2015-02-16T23:14:15+5:302015-02-16T23:14:15+5:30
जव्हारमध्ये युती, विक्रमगड, डहाणूत भाजपा तर तलासरीत माकपने बाजी मारली म्हणजे ६ पैकी ४ पंचायत समित्यांवर सेना-भाजपा अथवा त्यांची युती यांनी कब्जा केला.

पंचायत समित्यांवर भगव्याचे वर्चस्व
वसई-पालघर : आज झालेल्या सहा पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत वसईत बविआ, पालघरात सेना, जव्हारमध्ये युती, विक्रमगड, डहाणूत भाजपा तर तलासरीत माकपने बाजी मारली म्हणजे ६ पैकी ४ पंचायत समित्यांवर सेना-भाजपा अथवा त्यांची युती यांनी कब्जा केला.
४वसई : वसई पंचायत समितीच्या सभापतीपदी अर्नाळा किल्ला गणातून निवडून आलेल्या बहुजन विकास आघाडीच्या चेतना मेहेर यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाकडे मागास प्रवर्ग महिला उमेदवार नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली तर उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बविआच्या जयप्रकाश ठाकूर यांनी लोकहितवादी पाटी्रच्या सुरेश रेंजड यांचा ६ विरुद्ध २ अशा फरकाने पराभव केला.
४ उपसभापतीपदासाठी विरोधीपक्षाचे उमेदवार सुरेश रेजंड यांना ४ मतांनी पराभव पत्कारावा लागला. सरळ लढतीमध्ये ठाकूर ६ तर रेजंड यांना २ मते मिळाली. निवड झाल्यानंतर सभापती चेतना भोईर व उपसभापती जयप्रकाश ठाकूर या दोघांनाही सर्वांना विश्वासात घेऊन काम करू व ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देऊ अशी प्रतिक्रिया दिली.
४पालघर : सभापतीपदी शिवसेनेचे रवींद्र मुकुंद पागधरे तर उपसभापती मनोज गणपत संख्ये यांची बिनविरोध निवड झाली. या सेनेचे १९ ,बविआ १०, भाजपा ४, अपक्ष १ असे संख्या बळ होते.
४सभापतीपदासाठी सेनेतर्फे रवींद्र म्हात्रे (डमी) बविआ-भजपाच्या आघाडीने सपना मोरे तर उपसभापतीपदासाठी आघाडीतर्फे वीणा देशमुख, दीपक पाटील, विजय तरे यांनी अर्ज दाखल केले होते. आघाडीची सपना तरे यांनी माघार घेतल्याने पागधरे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदासाठी आलेला वीणा देशमुख यांचा अर्ज अवैध ठरला तर अन्य दोघांनी माघार घेतल्याने उपसभपतींची निवडही बिनविरोध झाली.
जव्हार सभापतीपदी ज्योती भोये
जव्हार : सेना भाजपाची युती होऊन ज्योती हरिश्चंद्र भोये या भाजपाच्या उमेदवार विजयी ठरल्या. तर उपसभापतीपदी शिवसेनेचे सीताराम पागी विजयी झाले. येथे भाजपाचे ५, सेनेचे ३, माकपचे २ असे संख्याबळ असून बहुमतासाठी भाजपाला एका सदस्याची गरज असल्याने त्यांनी सेनेशी युती केली. सेनेने अनुभवी सदस्य सीताराम पागी यांनी उपसभापतीपदासाठी संधी दिली. मार्क्सवादी पक्षातर्फे यशवंत घाटाळ , लक्ष्मण जाधव यांचे अर्ज दाखल केले होते. परंतु, सेने-भाजपाकडे ८ चे संख्याबळ असल्याने भोये आणि पागी विजयी झालेत. तुळशी चोरगा, कमलाकर भोये, हरिश्चंद्र भोये तसेच संदीप पाटील, भरत सोनार, बाबाजी काठोळे, पंचायत समिती सदस्य यशोदा भोये, विमल दुधेडा, अर्चना भोये, सुरेश कोरडा, सुरेखा थेथले, शिवसेना शहरप्रमुख चित्रांगद घोलप, चंद्रकांत घाग, उपस्थित होते.
विक्रमगड सभापतीपदी जिजाताई टोपले तर उपसभापतीपदी मधुकर खुताडे
विक्रमगड : विक्रमगड पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवार जिजा टोपले यांची वर्णी लागली असून उपसभापतीपदी मधुकर खुताडे यांनी निवड झाली. सभापती व उपसभापतीची निवड घेण्यात आली यावेळी भाजपाचे ६ उमेदवार निवडून आले होते तर राष्ट्रवादी १, शिवसेना २ व माकप १ अशी संख्या असताना मात्र भाजपाचे एक उमेदवार अनुपस्थित होते.
डहाणू पंचायत समिती भाजपाकडे
डहाणू : या पंचायत समितीच्या सभापतीपदी बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यावर भाजपाच्या चंद्रीका रामू आबांत तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचेच लतेस राऊत निवडून आले. भाजपचे १० , शिवसेना २, राष्ट्रवादीचे ६, बहुजन विकास आघाडी ४, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २ असे बलाबल होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उमेश यांनी काम पाहिले तर यावेळी भाजपाचे सभापती, उपसभापती यांची मिरवणूक काढून खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भरत राजपूत, कोरे, तसेच अशोक अंभिरे यांनी त्यांना पंचायत समिती कार्यालयात नेले.
तलासरीत दुमडा; भोये
तलासरी : सभापतीपदी माकपाचे वनशा सुरजी दुमडा तर उपसभापतीपदी भाजपाचे भानुुदास भोये यांची निवड चिठ्ठी पद्धतीने झाली.
तलासरी पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यामध्ये पंचायत समितीच्या १० जागांपैकी ५ माकप, ४ भाजप १ अपक्ष असे बलाबल होते. सभापतीपदाची आॅफर अपक्ष संगीता ओझरे यांना देऊन त्यांना भाजपाने आपल्या बाजूला खेचून घेतले. तरी बलाबल समान झाल्याने आकाश घरत याने चिठ्ठी काढली. सर्वांना बरोबर घेऊन तलासरी तालुक्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे दुमडा यांनी सांगितले. सभापती, उपसभापतीचे गटविकास अधिकारी राहुल धूम यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.