लसीकरणातील फसवेगिरीपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:51+5:302021-06-25T04:06:51+5:30

कोरोना रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू असताना कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीत तब्बल ३९० जणांना, लसी ऐवजी केवळ सलाईनचे ...

Beware of vaccine fraud | लसीकरणातील फसवेगिरीपासून सावधान

लसीकरणातील फसवेगिरीपासून सावधान

googlenewsNext

कोरोना रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू असताना कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीत तब्बल ३९० जणांना, लसी ऐवजी केवळ सलाईनचे पाणी इंजेक्शनने ‘टोचून’ लाखो रुपये कमावल्याचा धक्कादायक प्रकार १६ जून रोजी समोर आल्याने खळबळ उडाली. लसीकरण झालेल्या सोसायटीमधील रहिवाशांनीच आपली फसवणूक झाल्याची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात केल्याने ही बाब समोर आली.

कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण करण्यात आले. प्रत्येक रहिवाशांकडून १२६० रुपये शुल्क घेण्यात आले. खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी असल्याची ओळख सांगत काही तथाकथित दलालांनी हा लसीकरणाचा बनाव घडवून आणला. मात्र, लसीकरणाच्या वेळी लाभार्थ्यांना फोटो काढू देण्यात आले नाहीत. लसीकरणानंतर प्रमाणपत्र दुसऱ्या दिवशी तक्रार केल्यावर आली. ती तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रांच्या नावे आली. शिवाय वेगवेगळी तारीखही नोंदवण्यात आली. आणि त्या सर्व हॉस्पिटल्सनी ही सर्टिफिकेट्स त्यांची नसल्याचे व बनावट असल्याचे जाहीर केले. शिवाय लस घेतल्यानंतर ३९० जणांपैकी एकालाही लसीकरणानंतर दिसणारी सौम्य लक्षणेही दिसली नाहीत. त्यामुळे घेतलेल्या लसीबाबत लाभार्थ्यांना संशय आला. या प्रकाराची पुनरावृत्ती बोरीवलीच्या आदित्य कॉलेजमध्ये आणि टिप्स या बॉलीवूड कंपनीबाबत घडली आहे.

कोरोनाच्या लसीकरणाबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अनेकांना लसीकरण करून घ्यायचे आहे; पण त्यांना सरकारी किंवा खासगी लसीकरण केंद्रावर जाण्याचा कंटाळा आहे किंवा तिथल्या रांगेत उभे राहण्याबाबत आक्षेप आहेत. महाराष्ट्र सरकारने मे महिन्यापासून कॉर्पोरेट पद्धतीने लसीकरणास मंजुरी दिलेली आहे. यामध्ये मोठ्या कंपन्यांच्या कामगारांना किंवा नागरिकांच्या १०० जणांच्या अन्य गटाला अशा प्रकारे त्यांच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यास मंजुरी आहे. हे लसीकरण अधिकृत लसीकरण केंद्रामार्फत, प्रशिक्षित पारिचारिकांकडून आणि अधिकृत आणि मान्यताप्रत डॉक्टरांच्या उपस्थितीत केले जाते. मात्र, असे लसीकरणाचे शिबिर आखताना त्यासाठी काय करावे लागते, त्याचे नियम काय आहेत, प्रोटोकॉल्स काय आहेत, यांची जाणीव अशा अतिउत्साही व्यक्तींना नसते. नेमका त्याचा फायदा घेऊन असे समाजकंटक नेहमीच जनतेला गंडा घालत असतात. याही प्रकरणांमध्ये हेच घडले आहे. त्यामुळे अशी शिबिरे आखताना त्यासाठी काय के करावे लागते, यांची माहिती सर्वांना असली पाहिजे.

कोरोना लसीकरण शिबिराची प्रक्रिया

१ १८ वर्षांवरील किमान १०० जणांचा एक ग्रुप तयार पाहिजे.

२. या सर्वांनी कोविन किंवा आरोग्यसेतू ॲपवर रजिस्ट्रेशन करावे. मात्,र लसीकरणासाठी दिनांक आणि केंद्र यांची वेळ घेऊ नये.

३. ही यादी घेऊन आपल्या भागातील सक्षम आणि अधिकृत आरोग्याधिकाऱ्यास भेटावे.

•आपण महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात राहत असाल तर महापालिका आयुक्त अथवा मुख्य आरोग्याधिकारी अथवा आपल्या पालिका विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी

•काही माध्यम शहरात जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन अथवा मुख्य अधिकारी यांना भेटावे लागेल.

•ग्रामीण भागात जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य आरोग्य अधिकारी यांना भेटावे.

•ज्या शहरात खाजगी इस्पितळांना लसीकरण करण्याची अधिकृत परवानगी दिलेली आहे, अशा इस्पितळातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी

४. या अधिकाऱ्यास आपली यादी सादर करून, त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत मसुद्याचे करारपत्र करून घ्यावे.

५. यासाठी काही शुल्क असल्यास ते अधिकृत कोषागारात भरून त्याची पक्की पावती घ्यावी. लसीकरण शिबिर जिथे घ्यायचे आहे त्या जागेसाठी काही अटी पाळाव्या लागतील. लसीकरण सुरळीत आणि सुरक्षित व्हावे यासाठी या गोष्टी आवश्यक असतात.

•नोंदणी कक्ष – यात किमान ४ अधिकृत कर्मचारी बसून आलेल्या व्यक्तींची नोंदणी आणि आधार कार्डाची नोंद अधिकृत वेबसाइटवर अपलोड करतील. याकरिता या जागेत वाय-फाय किंवा डेटा अपलोड करणारे कनेक्शन हवे.

•प्रतीक्षागृह- किमान १० लोक एका वेळेस सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क वापरून रांगेत उभे राहू शकतील एवढी मोकळी जागा हवी.

•लसीकरण कक्ष- दोन परिचारिका आणि दोन नागरिक बसू शकतील आणि लसीकरणाचे साहित्य मावेल अशी १५० चौरस फूट खोली हवी.

•नियमानुसार लसीकरण पश्चात सर्वांना अर्धा तास बसवावे लागते. यासाठी एक वेगळा प्रतीक्षा कक्ष असावा.

•लसीकरण झाल्यावर जर कुणाला त्रास झाला तर त्याच्या उपचारासाठी वेगळी खोली असावी.

•शिबिर साधारणत: ७ तास चालते. या काळात लस शीतसाखळीत ठेवण्यासाठी योग्य आकाराचा चालू स्थितीतला रेफ्रीजरेटर असणे आवश्यक असते.

६. लसीकरण शिबिरात अधिकृत यादी सादर केलेल्या आणि तत्पूर्वी नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच समाविष्ट करावे. ऐनवेळेस येऊन आग्रह करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करू नये.

७. लसीकरण झाल्यावर किमान ४८ तासांत लसीकरत झाल्याचे सर्टिफिकेट आरोग्याधिकाऱ्यांकडून मिळू शकते. कोविनच्या वेबसाइटवर १ ते ४ तासांत हे सर्टिफिकेट आपला नोंदणी करताना वापरलेला मोबाइल क्रमांक टाकल्यास प्रत्यक्ष पाहायला मिळू शकते.

लक्षात ठेवा, आपल्या देशातील लसीकरण मोहीम ही अत्यंत काळजीपूर्वक आखलेली आणि नियंत्रित केलेली आहे. लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस अधिकृत लस आणि सुरक्षितपणे मिळावी यांची योजना यात केलेली आहे.

यामध्ये लस ही अधिकृतरीत्या सरकारला किंवा खाजगी इस्पितळांना लस बनवणाऱ्या कंपनीकडून घ्यावी लागते आणि वापरलेल्या प्रत्येक लसीच्या व्हायलचा हिशेब ठेवावा लागतो आणि तो कळवावा लागतो.

लसीकरण करणारी प्रत्येक परिचारिका ही खास प्रशिक्षण दिलेली असते. तसेच प्रत्येक लसीकरण केंद्राची केंद्र सरकारकडे नोंद केलेली असते. त्यामुळे हे सर्व नियम पाळणे आपल्याला आवश्यक आहेत.

स्वतःहून आलेल्या अनधिकृत व्यक्तींशी व्यवहार करू नये. आरोग्य खात्याच्या अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी अधिकृत लेखी परवानगी घेऊनच लसीकरण करावे. म्हणजे मुंबईतील खासगी निवासी संकुलातील नागरिकांची झाली तशी फसवेगिरी आपल्या बाबतीत होऊ नये.

- डॉ. अविनाश भोंडवे

Web Title: Beware of vaccine fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.