गौरी टेंबकर-कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सोने तारण कर्ज देणाऱ्या नामांकित फायनान्स कंपनीत हॉलमार्क दिसणारे पण प्रत्यक्षात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून ३४.८० लाख रुपयांची फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार मुंबईमधून उघडकीस आला आहे. यामुळे सामान्य ग्राहकांसह फायनान्स कंपन्यांमध्येही खळबळ उडाली आहे. आरबीआयच्या नियमांनुसार कार्यरत आय.आय.एफ.एल. फायनान्स लिमिटेड या एनबीएफसी कंपनीत हा प्रकार घडला. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक नौशाद इद्रिस (३९) यांनी २५ जून २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारदारांच्या अखत्यारीतील आठ शाखांपैकी जुहू येथील शाखा क्रमांक ६६६४ मध्ये १३ ते २१ जूनदरम्यान अचानक सुमारे ३५ लाख रुपयांचे सोने तारण कर्ज मंजूर झाले. या असामान्य व्यवहारामुळे संशय बळावला आणि २४ जून रोजी शाखेचे विशेष ऑडिट करण्यात आले. ऑडिटदरम्यान सहा ग्राहकांनी गहाण ठेवलेले ५३४.११ ग्रॅम वजनाचे दागिने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. हे दागिने सोन्यासारखे दिसण्यासाठी फक्त जाड मुलामा दिला होता. शिवाय दागिन्यांवर बनावटरित्या ९१६ हॉलमार्कही उमटवलेले होते.
कसा ओळखाल बनावट दागिना?
- सोन्याच्या दागिन्यांवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) चे अधिकृत चिन्ह असणे आवश्यक.
- हॉलमार्क असलेल्या दागिन्यावर ६ अंकी अल्फान्यूमेरिक एचयूआयडी नंबर असतो. तो ॲपवर तपासता येतो.
- २२ के, १८ के, २४ के अशी कॅरेट माहिती दागिन्यावर कोरलेली असावी.
- नेहमी बीआयएस नोंदणीकृत ज्वेलर्सकडूनच दागिने घ्या.
- पक्के बिल आणि हॉलमार्कचे प्रमाणपत्र महत्त्वाचे.
- बाजारभावापेक्षा खूपच कमी दर म्हणजे धोक्याची घंटा!
- जवळच्या बीआयएस हॉलमार्किंग केंद्रात दागिन्यांची शुद्धता तपासून घ्या.
३४.८० लाखांचे कर्ज, पण दागिने खोटे
ग्राहक अदनान उमेर शेख, अलिसन नेलसन कॅस्टन, अझीम रिझवान शेख, मानव अमित गौर, संजना विलास पवार आणि सोहेल जब्बार शेख यांना एकूण ३४.८० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. दागिने बनावट असल्याचे समोर येताच कंपनीने संपर्क साधला असता, संबंधित ग्राहकांनी दागिने सोडवण्यास नकार देत उलट कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Web Summary : A Mumbai finance company was defrauded of ₹34.80 lakhs. Fake gold jewelry, deceptively hallmarked, was pawned. Audits revealed the scam. Experts advise checking for BIS hallmarks, HUID numbers, and buying from registered jewelers to avoid fraud.
Web Summary : मुंबई में एक फाइनेंस कंपनी से ₹34.80 लाख की धोखाधड़ी हुई। जाली हॉलमार्क वाले नकली सोने के गहने गिरवी रखे गए। ऑडिट में घोटाले का खुलासा हुआ। विशेषज्ञों की सलाह है कि बीआईएस हॉलमार्क और एचयूआईडी नंबर जांचें और धोखाधड़ी से बचने के लिए पंजीकृत ज्वैलर्स से ही खरीदें।