Join us  

कडक निर्बंधांमुळे बेस्टच्या प्रवाशी संख्येत ४.८ लाखांची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 9:28 PM

Mumbai Best Bus : दररोज लाखो प्रवाशी बसमधून प्रवास करीत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक आहे.

मुंबई - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने सर्वसामान्य प्रवाशी बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करीत होते. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढून दररोज सरासरी २५ लाखांवर पोहोचली होती. मात्र मंगळवारपासून मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे बसगाड्यांमधून उभ्याने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिणामी बेस्ट प्रवासी संख्येत ४.८ लाखांनी घट झाली आहे. 

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून लॉकडाऊनपूर्वी दररोज सरासरी ३४ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र २३ मार्च २०२० पासून लॉक डाऊन लागू झाल्यानंतर बेस्टच्या प्रवाशी संख्येत मोठी घट झाली होती. जून २०२० पासून पुनश्च हरिओम झाल्यानंतर बेस्टमधील प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागली. सध्या दररोज सरासरी २५ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. 

दररोज लाखो प्रवाशी बसमधून प्रवास करीत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे मंगळवारपासून कडक निर्बंध लागू झाल्यानंतर बेस्ट बसमधील प्रवासी संख्यांवरही निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यानुसार बसमधून आता कोणीही उभ्याने प्रवास करू शकत नाही. केवळ आसन व्यवस्था असेल तेवढेच प्रवासी बसमध्ये घेण्यात येत आहेत. त्यामुळे आता २० लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. परिणामी दररोजच्या उत्पन्नात २२ लाखांची घट झाली आहे. 

 

टॅग्स :मुंबईबेस्ट