Join us  

बेस्टचा रोजचा पास आता ६० रूपये, विद्यार्थ्यांच्या अमर्याद फेऱ्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:28 AM

बसपास योजनेमध्ये सुधारणा; यापुढे ४२ ऐवजी १८ प्रकारचे पास.

मुंबई :बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सध्या सुरू असलेल्या बसपास योजनेत ७ एप्रिल २०२३ पासून सुरू असलेल्या योजनेत बदल करण्यात आले आहेत. रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना पाससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मासिक पासमध्ये १५० रुपये, तर दैनंदिन पासमध्ये दहा रुपयांची वाढ केली आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसपास योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, ही सुधारित बसपास योजनेत दरवाढ करण्यात आली आहे. या नव्या योजनेची अंमलबजावणी शुक्रवारी, १ मार्चपासून सुरू झाली आहे.

सुधारित बसपास योजनेमध्ये एकूण ४२ ऐवजी १८ बसपास करण्यात आलेले आहेत. हे बसपास ६ रुपये, १३ रुपये, १९ रुपये तसेच २५ रुपयांपर्यंतच्या सध्याच्या वातानुकूलित व विनावातानुकूलित प्रवास भाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. तसेच अमर्याद बसप्रवासाकरिता दैनंदिन ६० रुपये आणि मासिक ९०० रुपये मूल्यवर्गाचे बसपास उपलब्ध आहेत. 

प्रवासासाठी असलेल्या बसपासचे मूल्य ७५० रुपयांऐवजी ९०० रुपये करण्यात आलेले आहे. या बसपासचा कालावधी ३० दिवसांचा असून, अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आली. दैनंदिन बसपास ५० ऐवजी ६० रुपये करण्यात आलेला असून, अमर्याद प्रवासाची सुविधा कायम ठेवली आहे.

विद्यार्थ्यांच्या पास योजनेत बदल नाही :

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० रुपये मूल्यवर्गाचा मासिक बसपास उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बसपासच्या सहाय्याने अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा देण्यात आलेली आहे. या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

यांनाही मिळणार लाभ :

बेस्ट उपक्रमाचे सेवानिवृत्त सेवकवर्ग सदस्य यांच्याकरिता असलेल्या ९०० रुपये आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांकरिता असलेल्या ३६५ रुपयांच्या वार्षिक मूल्यवर्गाच्या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सवलत :

बसपास योजनेमधील सर्व बसपास ‘बेस्ट चलो ॲप’ अथवा ‘बेस्ट’ उपक्रमाने उपलब्ध केलेल्या विविध ‘स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक बसपासमध्ये ५० रुपयांची सवलत कायम ठेवण्यात आलेली आहे. साप्ताहिक बसपासमध्ये कोणतीही सवलत नाही. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेशधारक विद्यार्थ्यांना तसेच ४० टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :मुंबईबेस्ट