बेस्टला हानी पोहोचविणार नाही
By Admin | Updated: August 18, 2014 01:56 IST2014-08-18T01:56:05+5:302014-08-18T01:56:05+5:30
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने टाटा पावरच्या वीज वितरण परवान्याचे पुढील २५ वर्षांसाठी नूतनीकरण केले

बेस्टला हानी पोहोचविणार नाही
मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने टाटा पावरच्या वीज वितरण परवान्याचे पुढील २५ वर्षांसाठी नूतनीकरण केले असतानाच शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला काहीच हानी पोहोचविणार नसल्याचे स्पष्टीकरण टाटा पावर कंपनीने केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी टाटाला बेस्टच्या क्षेत्रातही वीज वितरणासाठी हिरवा कंदील दिला होता. यावर बेस्टचे धाबे दणाणले होते. शिवाय बेस्टने टाटा पावरच्या अनेक त्रुटी समोर आणत त्यांच्या वीज वितरणाला खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच टाटा पावरचा मुंबईचा वीज वितरणाचा परवाना संपत असल्याने कंपनीने परवाना नूतनीकरणासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता.
१५ आॅगस्ट रोजी वीज नियामक आयोगानेही टाटा पावरच्या वीज वितरण परवान्याचे पुढील २५ वर्षांसाठी नूतनीकरण केले. त्यामुळे २०३९ सालापर्यंत टाटा पावरला मुंबईत वीज वितरीत करण्यात येणार आहे. शिवाय छोट्या ग्राहकांसाठी असणारी टाटाची वीज स्वस्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हिरवा कंदील आणि नियामक आयोगाकडून झालेले परवान्याचे नूतनीकरण, या दोन्ही मुद्द्यांवर टाटाचे बळ आणखी वाढले आहे.
तत्पूर्वी टाटाने बेस्टच्या क्षेत्रातील छोट्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. धारावीसह कुलाब्यातील झोपडपट्ट्यांमध्ये कंपनीने वीज ग्राहकांसाठी जनजागृती शिबिर आयोजित करीत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. या वीज ग्राहकांना वीज पुरवता यावी, म्हणून कंपनी शहरातही वीज वितरणाचे जाळे उभे करीत आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांमुळे कंपनीच्या कामास विलंब होत असला तरी बेस्टचे छोटे ग्राहक स्वस्त विजेसाठी टाटाकडे वर्ग होणार, हे निश्चित आहे.
दरम्यान, तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला परवाना नूतनीकरणानंतरही दिलासा मिळणार असून, मुंबईच्या वीज वितरण क्षेत्रातील उपक्रमाचे योगदान पाहता त्यांचा व्यवसायही धोक्यात येणार नाही आणि याची जबाबदारी टाटा पावर घेईल, असेही स्पष्टकरण कंपनीने प्रसारमाध्यमांना दिले आहे. (प्रतिनिधी)