Join us  

मुंबईच्या वाहतूककोंडीवर 'कारपूल' ठरू शकतो सर्वोत्तम उपाय

By अोंकार करंबेळकर | Published: October 07, 2017 2:40 PM

तुम्ही मुंबईत कोठेही टॅक्सीची वाट पहात असता आणि तुमच्यासमोरुन केवळ एकेक प्रवासी बसलेल्या टॅक्सी किंवा कार जात असतात. अशावेळेस एका कारमधून दोन ते चार लोकांनी प्रवास केला तर सर्वांना लवकर ऑफिसात जाता आले असते. असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येऊन जातो.

मुंबई - तुम्ही मुंबईत कोठेही टॅक्सीची वाट पहात असता आणि तुमच्यासमोरुन केवळ एकेक प्रवासी बसलेल्या टॅक्सी किंवा कार जात असतात. अशावेळेस एका कारमधून दोन ते चार लोकांनी प्रवास केला तर सर्वांना लवकर ऑफिसात जाता आले असते. असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येऊन जातो. नेमके हेच तत्त्व कारपूलींगमध्ये वापरले जाते. एकाच दिशेने जाणा-या लोकांनी चार वेगवेगळ्या कारचा वापर करण्याऐवजी एकाच कारमधून प्रवास करायचा यामुळे वेळेची, पैशांची आणि इंधनाची बचत तर होतेच, त्याहून शहरातील रस्त्यांवर कोंडी कमी होते.

कारपूलिंग ही संकल्पना पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिकेत जास्त विकसित झाली आहे. १९७० च्या दशकात इंधन तुटवड्याच्या काळात लोक याचा अधिकाधिक वापर करू लागले. वाहनांमुळे होणारी कोंडी कमी होण्यासाठी हे सर्वात चांगले पाऊल असल्याने अमेरिकेत कारपूलिंगला विशेष महत्त्व दिले जाते. कारपूल लेन नावाचा विशेष मार्गही रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात येतो. या कारपूल लेनवर फक्त कार शेअर करणारे प्रवासी जाऊ शकतात. त्यामुळे ते वेगाने आणि लवकर इच्छितस्थळी पोहोचतात. अशी संकल्पना मुंबईत आता काही ठिकाणी येऊ लागली आहे. शहराच्या एकाच भागात काम करणारे लोक ठरवून असे गट करुन एकाच गाडीतून प्रवास करू शकतात. 

उपनगरी गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेत सुखरुप पोहोचण्यासाठी याचा वापर ते करु शकतात. कांदिवलीतील व्हीसलिंग पाम नावाच्या रहिवासी संस्थेने असाच एक 'लिफ्ट करादे' नावाने व्हॉटसअॅप गट स्थापन करुन कारपूलिंग सुरू केले. कुणालाही रिक्षा, टँक्सी, कारने शहराच्या कोणत्याही भागात जायचे असेल तर रहिवासी एकमेकांना मी अमूक भागात अमूक वेळेस जात आहे, कोणीलाही गाडीतून यायचे असेल तर कळवा असे संदेश पाठवतात. यामुळे सर्व सदस्यांनी दररोज स्वतःची गाडी बाहेर काढून होणारा इंधनाचा खर्च कमी झाला. इंधनाचा खर्च वाटून घेऊन त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याप्रमाणेच कांदिवलीतील रक्षित सेठ नावाच्या तरुणाने ' स्मार्ट मुंबईकर' नावाने गट स्थापन केले. ठाणे, कल्याण, नवी मुंबई, उत्तर मुंबई वगैरे शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशातून रोज कामासाठी येणा-या लोकांसाठी त्याने व्हॉटसअॅपवर वेगवेगळे गट स्थापन केले आणि त्यांच्या एकत्र प्रवासाचे नियोजन तो त्यावरुन करतो. असे कारपूलिंग वाढत गेल्यास दक्षिण मुंबई, परळ, वरळी, अंधेरी, वांद्रे, कुर्ला अशा भागातील कोंडी कमी करता येईल.

कारपूलिंगमुळे लोक एकत्र आले - संतोष शेट्टी संस्थापक, लिफ्ट करा दे कारपूलिंगमुळे आमच्या सोसायटीमधील सर्व सदस्यांनी दररोज गाडी बाहेर काढून प्रवास करणे कमी झाले, आम्ही एकमेकांच्या कारमधून प्रवास करु लागलो. तसेच इंधन खर्च कमी झाला आणि वेळेची बचतही होते. यामुळे सोशलायझिंग वाढले आणि एकीची भावनाही सदस्यांमध्ये निर्माण झाली.

 कंपन्यांचेही कारपूलिंगला प्राधान्य - रक्षित सेठ, संस्थापक, स्मार्ट मुंबईकरबेस्ट बसने, एसी बस वापरणे थांबवले आहे. त्यामुळे वेगाने आणि आरामदायी प्रवासाचे पर्याय मुंबईकरांसाठी फारसे उरलेले नाहीत. प्रत्येकवोळेस स्वतःची कार किंवा स्वतंत्र टॅक्सी करणे परवडत नाही. शिवाय एकेका माणसासाठी कार किंवा टॅक्सी चालवल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या वाढते. काही कंपन्या आपल्या कर्मचा-यांना कारपूल वापरण्याचा आग्रह किंवा विनंती करत आहेत. त्यामुळे कर्मचा-यांना  ऑफिसात वेळेच पोहोचणे शक्य होते. मुंबईकरांनी कारपूलिंगचा विचार अवश्य करावा.

आम्ही पर्याय निवडला, तुम्हीही विचार करा - योगेश कुलकर्णी, कारपूलचा वापर करणारे प्रवासीएल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतली वाढत जाणारी गर्दी आणि त्या गर्दीचे नियोजन, वाहतूक हा प्रश्न परत एकदा भयंकर पद्धतीने समोर आला आहे.

मुंबईमधली गर्दी कमी होणार नाही, कमीत कमी नजीकच्या काळात तशी शक्यता नाही. लोकल ट्रेन्स आणि बसेस हा आपला सार्वजनिक वाहतुकीचा पाया, पण त्या पायावर येणारा भार वाढत जात आहे. एखादी इमारत जशी फक्त वरचे मजले वाढवत नेले तर कोसळेल तशी मुंबईची वाहतूक व्यवस्था कोसळत आहे.पर्यायी वाहतूक व्यवस्था जशी मेट्रो किंवा मोनोरेल ह्यांना कार्यक्षम होण्यासाठी अजून ५-७ वर्ष तरी जातील, तोपर्यंत काय? खास करुन जेथे लोअर परेल, बिकेसी, फोर्ट वगैरे भागात जिथे मुळात जागाच कमी आहेत तिथे हा प्रश्न जास्त गंभीर.यावर तात्काळ आणि काही प्रमाणात कार्यक्षम तोडगा म्हणजे कारपूल. मी स्वतः गेली तीन वर्षे ठाणे ते लोअर परेल स्वतःच्या गाडीने जातो आणि स्मार्ट मुंबईकर किंवा शेअरिंगो नावाच्या कारपूल ग्रुपचा सदस्य आहे.

आम्ही ३-४ जण एका कारमध्ये जातो आणि खर्च शेअर करतो.

गेल्या तीन वर्षात याचे 3 महत्त्वाचे फायदे झाले. 

१)प्रवासाचा खर्च कमी झाला.

२) प्रवासाचा वेळ कसा जातोय हे कळलं नाही.

३) वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा परिचय आणि त्यातून मिळणारी माहिती.

यातील बरेचसे चांगले मित्र झालेत. रक्षित शेठच्या मेहनतीने आम्ही हे सगळं करु शकलो. किमान ४००-५०० गाड्या मुंबईच्या रस्त्यावर कमी आल्या असतील आणि एरव्ही एकमेकांच्या आयुष्यात कधीच आले नसते असे लोक एकमेकांचे मित्र झाले. सार्वजनिक वाहतुकीतून २०००-२५०० लोक कमी झाले.जर एक माणूस हे सगळं करू शकतो, तर सरकारने ठरवलं तर कारपूल ही एक खूप चांगली संधी होऊ शकते.

 

टॅग्स :प्रवासमुंबईएलफिन्स्टन चेंगराचेंगरीराज्य परीवहन महामंडळ