Join us  

BEST Strike : उशिरा आलेल्यांना परीक्षेला बसू द्या, मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 12:11 PM

BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्व सामान्यांसहीत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. याची खबरदारी घेत मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटकाउशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्यावे - मुंबई विद्यापीठआज एकूण 17 परीक्षा आहेत

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्व सामान्यांसहीत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. याची खबरदारी घेत मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. संपाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही, अशा वेळी परीक्षा केंद्रप्रमुख आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे, अशी सूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या आज एकूण 17 परीक्षा आहेत. लॉ, एमएस्सी, एम कॉम, एम, बीएड ,एमपीएड, बीपीएड, बीएड(स्पेशल एज्युकेशन),एमएड या विभागाच्या परीक्षा आहेत. संपामुळे होणाऱ्या त्रासामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचल्यास त्यात विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे आणि हा संदेश महाविद्यालयांना पोहोचवण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

(BEST Strike : मुंबईकरांच्या मदतीला एसटी आली धावून)

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांसाठीवेठीस धरत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून बेस्ट कामगारांनी संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, बेस्टच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी मुंबईकरांच्या मदतीला धावून आली आहे. सध्या एकूण 40 एसटी बसेस प्रवाशांसाठी रस्त्यावर धावत आहेत. शिवाय, गरजेनुसार जादा एसटी बसेस सोडण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.

कुर्ला पश्चिम ते बांद्रा - 05 एसटीकुर्ला पूर्व ते चेंबूर - 05 एसटी

दादर ते मंत्रालय - 05 एसटीपनवेल ते मंत्रालय  - 05 एसटी सीएसएमटी ते मंत्रालय - 05 एसटीठाणे ते  मंत्रालय - 15 एसटी

(Live : बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, सर्वसामान्य वेठीस)

संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक न्यायालयातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच आव्हान दिले. यामुळे संतप्त कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होत आहेत. 

दरम्यान, बेस्ट चालक-वाहक संपामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले असल्यानं पश्चिम उपनगरातील बस सेवाच ठप्प झाली आहे. त्यामुळे स्टेशनपासून दूरवर राहणाऱ्या आणि रोज बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे, शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तर दुसरीकडे, बेस्टच्या संपाचा फायदा घेत टॅक्सी-रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांकडून अव्वाच्या-सव्वा भाडे उकळले जात आहे. शेअर रिक्षाचालकांकडून आज 30 रुपये भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. दरम्यान, बेस्ट संपामुळे आज अनेक विद्यार्थी शाळा तसंच कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत.

काय आहेत मागण्या?- सुधारित वेतन करार- दिवाळीचा बोनस- कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविणे- बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण 

कारवाई होणारसंपात सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिला आहे. आश्वासनावरच बोळवण गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. मात्र, कामगारांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. दरवर्षी आश्वासनावरच बोळवण होत आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप टळणार नाही, असा इशारा बेस्ट वर्कर्स  युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.

शिवसेनेचा नैतिक पाठिंबासत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे या संपाला शिवसेना नेत्यांनी नैतिक पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगारांनी मागे घेतला होता. त्यामुळे पुन्हा संप होऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, बेस्ट प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी जादा गाड्या सोडण्यासाठी एस.टी. महामंडळाला पत्र पाठविले असल्याचे बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, ९५ टक्के कामगार संपाच्या बाजूने असल्यामुळे बससेवेवर परिणाम होणार आहे.

टॅग्स :बेस्टमुंबई विद्यापीठसंपमुंबई