‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची औषधी बाग

By Admin | Updated: May 8, 2015 00:28 IST2015-05-08T00:28:44+5:302015-05-08T00:28:44+5:30

जुईनगर येथील पारिजात हाउसिंग सोसायटीला औषधांचा खजिना या नावाने ओळखले जाते. ही ओळख प्राप्त करून दिली आहे तेथील रहिवासी आणि बेस्टचे

'Best' staff's medicinal garden | ‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची औषधी बाग

‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची औषधी बाग

नवी मुंबई : जुईनगर येथील पारिजात हाउसिंग सोसायटीला औषधांचा खजिना या नावाने ओळखले जाते. ही ओळख प्राप्त करून दिली आहे तेथील रहिवासी आणि बेस्टचे चालक आबा रणवरे यांनी. त्यांनी विविध आजारांवर गुणकारी अशा ४०हून अधिक वनौषधींची लागवड करून रोपवाटिका तयार केली आहे.
आबा विठ्ठल रणवरे हे व्यवसायाने जरी डॉक्टर नसले तरी त्यांच्या बागेतल्या गुणकारी वनस्पतींनी मोठमोठ्या आजारांवर उपचार केले जातात. रणवरे यांना लहानपणापासूनच निसर्ग संवर्धन आणि बागकामाची आवड होती. मूळचे पुणे जिल्ह्यातील असलेल्या या रणवरेंनी आपल्या गावी देखील भाज्यांची लागवड केली आहे. १९८५ साली ते बेस्टमध्ये रुजू झाले आणि मुंबईत स्थायिक झाले. त्यानंतरही निसर्गप्रेम कायम ठेवण्याचा संकल्प करत त्यांनी घरासमोरच रोपवाटिका तयार केली. बागेत दुर्मीळ औषधी वनस्पतीही आहेत. तिथले रहिवासी डॉक्टरांकडे न जाता रणवरे यांच्याकडील औषधी रोपवाटिकेचा मार्ग धरतात. मधुमेह, क्षयरोग, डोळ्यांच्या समस्या, दमा, मूळव्याध, मुतखडा, अर्धशिशी, रक्तदाबाच्या समस्या, अतिसार, सर्दी - खोकला, स्त्रीरोग अशा नानाविध आजारांना दूर पळवतील अशा दुर्मीळ वनस्पतींची लागवड त्यांच्या बागेत करण्यात आली आहे.
सध्या त्यांच्या बागेत मधुनाशिनी, पाणफुटी, अडुळसा, कृष्ण तुळस, राम तुळस, कापूर तुळस, वैजयंती तुळस, गवती चहा, कडुनिंब, गोकर्णी, कोरफड, लाजाळू, जांभूळ, इन्सुलिन प्लाण्ट, पानओवा, नागवेली, जास्वंद, ब्रह्मकमळ अशा विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. या सर्वच वनस्पती कोणत्या ना कोणत्या आजारावर औषध म्हणून वापरल्या जातात. या त्या बागेतील दवाखान्याला भेट देणाऱ्या प्रत्येकाला मोफत वनऔषधी दिल्या जातात.
डॉक्टरांची वारी करून दमलेल्या कित्येक रुग्णांनी या निसर्गरूपी औषधांचा लाभ घेतला आहे. या गुणकारी वनस्पतींचा लाभ झालेले रु ग्ण पुन्हा पत्रव्यवहार करून रणवरे यांना धन्यवाद देतात.
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे या भागातील असंख्य रुग्णांनी या वनौषधींचा लाभ घेतला आहे.

Web Title: 'Best' staff's medicinal garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.