Join us  

बेस्टच्या कर्मचारी वर्गाच्या पगाराचीही बोंब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:56 AM

मुंबई शहर आणि उपनगरात परिवहन सेवा देत असलेल्या बेस्ट प्रशासनाची आर्थिक स्थिती दिवसागणिक ढासळत चालली आहे

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात परिवहन सेवा देत असलेल्या बेस्ट प्रशासनाची आर्थिक स्थिती दिवसागणिक ढासळत चालली आहे. बेस्टवर कर्जाचा डोंगर कायम असून, बेस्ट कर्मचारी वर्गास नोव्हेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी बेस्टकडे पैसे नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट कर्मचारी वर्गास बोनस देण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतरही बेस्टचे कर्मचारी अद्यापही रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्टकडे कर्मचारी वर्गास नोव्हेंबर महिन्याचा पगार देण्यासही रक्कम नसल्याचे चित्र आहे. यासाठीचे ७६ कोटी रुपये कोठून आणायचे, असा यक्षप्रश्न बेस्टसमोर असून, बोनसबाबतही उपक्रम अद्याप चित्र स्पष्ट करत नसल्याची स्थिती आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत कर्मचारी वर्गास बोनस देण्याबाबत मंजुरी मिळाली असली तरी हा बोनस कर्मचारी वर्गास मिळणार कधी? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.दुसरीकडे मुंबई शहरात बेस्टकडून जी वीज पुरवली जाते; ती वीज बेस्ट टाटाकडून खरेदी करते. या विजेचे बेस्टकडून टाटाला २१९ कोटी रुपये येणे बाकी आहे. या रकमेवर दहा टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पैशाचे देणे देण्यासाठी बेस्ट कर्ज काढणार आहे.

टॅग्स :बेस्ट