बेस्ट ‘संकल्पा’ला निवडणुकीचा फटका
By Admin | Updated: October 8, 2014 02:15 IST2014-10-08T02:15:57+5:302014-10-08T02:15:57+5:30
बेस्ट उपक्रमाचा सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांना आज सादर केला

बेस्ट ‘संकल्पा’ला निवडणुकीचा फटका
मुंबई : बेस्ट उपक्रमाचा सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांना आज सादर केला. निवडणुकीच्या काळात भाडेवाढ न करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने यापूर्वीच बेस्टला दीडशे कोटींचे पॅकेज दिले होते. परंतु अन्य अनुदानांचे आश्वासन पाळण्यात न आल्यामुळे यंदा बेस्ट भाडेवाढीचे संकेत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने हा अर्थसंकल्प सीलबंदच ठेवण्यात आलेला आहे.
पालिकेच्या महासभेची मंजुरी घेणे आवश्यक असल्याने बेस्टचा आगामी वर्षातील अर्थसंकल्प आॅक्टोबरमध्ये सादर केला जात असतो. त्यानुसार हा अर्थसंकल्प बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनाने आज मांडला. यातून दोन ते सहा रुपये भाडेवाढीची शिफारस असण्याचे संकेत आहेत. पण विधानसभा निवडणुकांसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत असल्याने आचारसंहितेच्या काळात बेस्टला आपल्या योजना जाहीर करता येणार नाहीत. त्यामुळे बेस्ट अर्थसंकल्पात नेमके काय दडले आहे, हे आता निवडणुकीनंतर उजेडात येणार आहे.
अध्यक्षाला प्रचाराची घाई
बेस्ट समितीचे विद्यमान अध्यक्ष अरुण दुधवडकर मलबार हिल मतदारसंघातून आमदारकीच्या शर्यतीत उतरले आहेत. अध्यक्ष या नात्याने आजच्या बैठकीत हजर राहणे त्यांना भाग होते. परंतु अवघे सहा दिवस उरल्याने उमेदवारांत प्रचाराची लगबग सुरू आहे. दुधडवकरही त्याच घाईत असल्याने बेस्ट समितीची बैठक लवकर आटपली. (प्रतिनिधी)