कोसळणारे डोंगर थोपवण्यासाठी वृक्षलागवडीचाच पर्याय उत्कृष्ट!

By Admin | Updated: August 11, 2014 22:40 IST2014-08-11T22:35:03+5:302014-08-11T22:40:09+5:30

डोंगर कोसळून होणारी आपत्ती रोखायची असेल तर - असे मत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि भारतीय पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर

The best option for the trees to stop the collapsing mountains! | कोसळणारे डोंगर थोपवण्यासाठी वृक्षलागवडीचाच पर्याय उत्कृष्ट!

कोसळणारे डोंगर थोपवण्यासाठी वृक्षलागवडीचाच पर्याय उत्कृष्ट!

मनोज मुळ्ये -- रत्नागिरी   डोंगर कोसळून होणारी आपत्ती रोखायची असेल तर वृक्षलागवडीला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे आणि त्यात राजकीय लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे स्पष्ट मत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि भारतीय पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केले. आज डोंगर उजाड होऊ लागले असून, वृक्षलागवड झाली नाही तर दुर्दैवाने कोकणावरही तशीच वेळ येऊ शकेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या आपत्ती आल्यानंतरही ही बाब पचनी पडत नसेल तर त्यासाठी कडक कायदा करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अलिकडेच माळीण गावातील दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. कोकणातही अशा घटना घडत आहेत. त्याचे प्रमाण छोटे असल्यामुळे त्याची तीव्रता कोणाच्या लक्षात आलेली नाही. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर कोकणातही माळीणसारखी दुर्घटना घडू शकते, असे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांत जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तोडलेल्या लाकडाचा फर्निचरसाठी वापर होतोच. पण, त्यापेक्षा अधिक वापर सरपणासाठी होतो. आजही ग्रामीण भागात सिलिंडरचे प्रमाण अत्यल्प आहे. रॉकेल उपलब्ध होत नाही आणि परवडतही नाही. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीवरच जेवण शिजवले जाते. त्यासाठी सर्रास लाकूडतोड होते. इंधन म्हणून त्या लोकांना जर लाकडाचाच पर्याय असेल तर ग्रामपंचायतींनी जळाऊ लाकडाची लागवड करायला हवी. ही लाकडे उपलब्ध नसल्यामुळे लोक आंबा, काजूसारखी उत्पन्न देणारी झाडे तोडतात. त्यामुळे डोंगर उघडे पडत आहेत, अशी खंत त्यांनी मांडली.
झाडांची मुळे खोलवर पसरतात आणि माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे अतिवृष्टीमध्येही डोंगरावरची माती खाली येत नाही. डोंगरांची पडझड रोखण्यासाठी वृक्ष लागवड हा उत्कृष्ट पर्याय आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी त्याला दिशा द्यायला हवी, असेही ते म्हणाले.
वृक्षतोडीप्रमाणेच मोकाट जनावरांमुळेही मातीचा ऱ्हास होतो. मोकाट जनावरे गवत उपटून खातात. त्या गवतासोबत मातीही उपटली जाते. ही माती सैल होते आणि पावसाबरोबर ती वाहून जाते. यात खूप नुकसान होते. जनावरांना चारा उपलब्ध करून द्यायला हवा. जनावरे मोकाट सोडण्याचे प्रकारही रोखायला हवेत, असे ते म्हणाले.

परंपरांमध्ये थोडा बदल हवा
आपल्याकडे अनेक ठिकाणी होळीसाठी मानाचे म्हणून आंब्याचे झाड तोडतात. परंपरा, रूढी आपल्याजागी योग्य आहेत. मात्र, होळीसाठी म्हणून काही झाडे मुद्दाम लावली जातात का, या प्रश्नाला नकारात्मकच उत्तर येते. रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथे ग्रामस्थांना बरोबर घेत आपण रायवळची १00 झाडे लावली आहेत. ही झाडे होळीसाठीच वापरली जावीत, असे अपेक्षित आहे. कलमे तोडण्यापेक्षा होळीसाठी म्हणून वृक्ष लागवड झाली तर त्याचा फायदा होईल.

लाकूडतोड प्रामुख्याने इंधनासाठी म्हणून केली जाते. खास सरपणासाठी म्हणून कमी काळात वाढणाऱ्या जातींची झाडे लावली गेली तर पर्यावरणात भर पडेल आणि इंधनाची गरजही भागेल.
हिरडा-बेढा, बिब्बा, तिरफळ यांसारख्या गोष्टी बाहेरच्या जिल्ह्यांमधून येतात. त्यांची लागवड डोंगरांवर झाली तर त्यातून उत्पन्न मिळेल आणि पर्यावरणही टिकून राहील.
होळीसारख्या सणांना लागणाऱ्या झाडांची स्वतंत्र लागवड व्हायला हवी. अनेक वर्षांपूर्वी लावलेली आणि आता चांगली उत्पन्न देणारी कलमे तोडण्यापेक्षा अशी स्वतंत्र लागवडच झाली तर तेही फायदेशीर होईल.

Web Title: The best option for the trees to stop the collapsing mountains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.