बेस्ट कामगार आक्रमक
By Admin | Updated: August 6, 2015 00:29 IST2015-08-06T00:29:50+5:302015-08-06T00:29:50+5:30
बेस्ट उपक्रमाच्या वीज आणि परिवहन कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने बेस्ट दिनीच निषेध मोर्चाची हाक दिली आहे.

बेस्ट कामगार आक्रमक
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या वीज आणि परिवहन कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने बेस्ट दिनीच निषेध मोर्चाची हाक दिली आहे. बेस्ट दिनानिमित्त माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित विशेष कार्यक्रमावर हा मोर्चा धडकणार आहे.
युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत बेस्ट प्रशासनावर गंभीर आरोप केले. गायकवाड म्हणाले, करारांमधील तरतुदींची अंमलबजावणी करण्यास बेस्ट प्रशासन अपयशी ठरले आहे. आर्थिक अडचणीचा बागूलबुवा करून प्रशासनाने रिक्त पदांवर पदोन्नती रोखण्याचे आदेश काढले आहेत. शिवाय उपक्रमाच्या आस्थापना अनुसूचीवर असलेली पदे गोठविण्याचे संकेत देणारे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय करणारे परिपत्रक तत्काळ रद्द करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
युनियनने दिलेल्या माहितीनुसार, वारंवार मागणी करूनही विजेची उपकरणे व विजेच्या सान्निध्यामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना मूळ वेतनाच्या १० टक्के इलेक्ट्रिक हॅजार्ड भत्ता दिला जात नाही. प्रशासनाने युनियनसोबत करार केला असूनही वाढीव मूळ वेतनावर प्रोरेटा रक्कम प्रदान केली जात नाही.
अशा अनेक मागण्यांची पूर्तता केलेली नसल्याने प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वीज आणि परिवहन विभागातील कर्मचारी मोर्चामध्ये सामील होतील. (प्रतिनिधी)