Join us  

बेस्टकडे १२ कोटींची चिल्लर पडून; दरमहा बुडते एक कोटीचे व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 4:24 AM

रोज जमा होते सरासरी दीड कोटीची चिल्लर

मुंबई : एकेकाळी सुट्ट्या पैशांची चणचण भासणाऱ्या बेस्ट उपक्रमासाठी हेच सुट्टे पैसे सांभाळणे डोक्याला ताप झाले आहे. भाडेकपातीनंतर बस आगारांमध्ये १२ कोटी चिल्लर जमा झाली आहे. मात्र कंत्राट दिलेल्या कंपनीने चिल्लर नेण्यास टाळाटाळ केल्यामुळे बेस्टचे दरमहा एक कोटीचे व्याज बुडत आहे. या गंभीर विषयाकडे बेस्ट समितीच्या बैठकीत शुक्रवारी चर्चा करण्यात आली.बेस्ट समिती सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी बेस्ट समिती सभेत याकडे लक्ष वेधले. मुंबईत बेस्ट उपक्रमाचे २७ बस आगार असून प्रत्येक बस आगारात ही परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवार १ जानेवारी २०२० रोजी सर्व आगारांत मिळून ११ कोटी ५० लाखांची चिल्लर जमा आहे.दररोज दीड कोटीची चिल्लर जमा होत असल्याने व वेळीच उपाययोजना न केल्यास या महिनाअखेरीस ५० कोटींची चिल्लर जमा होईल. प्रत्येक आगारातील स्ट्राँगरूम या चिल्लरने भरलेल्या आहेत. महत्त्वाची कपाटेही नोटांनी भरून गेली आहेत. महिन्याला एक कोटी १२ लाखांचे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले.चिल्लर उचलण्यास कंपनीचा नकारआगारात जमा झालेली चिल्लर व रक्कम नेण्याचे कंत्राट ब्रिन्क्स आर्या या कंपनीला दिले आहे. या कंपनीने रोज संपूर्ण चिल्लर उचलण्यास आता नकार दिला आहे. फक्त २००, ५०० व २००० च्या नोटा स्वीकारते व ५ व १० रुपयांची ८० टक्के नाणी स्वीकारत आहे. यामुळे आगारात बेस्टकडे जमा झालेल्या १ व २ रुपयांच्या चिल्लरचे करायचे काय, असा सवाल संबंधित अधिकाऱ्यांना पडला आहे.लवकरच तोडगा निघेलबसभाडे कमी झाल्यापासून चिल्लरची समस्या वाढली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबरोबर बोलणी सुरू आहेत. तसेच चिल्लर उचलण्याचे कंत्राट दिलेल्या ब्रिन्क्स आर्या या कंपनीला आदेश देऊन लवकरच या चिल्लरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सांगितले.

टॅग्स :बेस्ट